अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटात काम करणारी, तसेच अनेक मराठी मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे हिला लोकप्रियता मिळाली. मागील काही महिन्यांपासून भाग्यश्री तिच्या कामामुळे नाही, तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. भाग्यश्रीने ५ महिन्यांपूर्वी लग्न केलं, लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच तिच्या आईचं निधन झालं. आईच्या इच्छेप्रमाणे भाग्यश्रीने अरेंज मॅरेज केलं होतं. आता लग्नाला पाच महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या पतीचं कौतुक केलं आहे.

भाग्यश्री न्हालवेच्या पतीचं नाव उदय कुंडप आहे. उदय हा डॉक्टर आहे. भाग्यश्रीने उदयबरोबरचे देवदर्शनाचे काही फोटो पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गडबडीत लग्न झालं तरी तू सांभाळून घेतलंस, नात्यात पुरुषी अहंकार येऊ दिला नाहीस, तू देवाने दिलेलं गिफ्ट आहेस, असं भाग्यश्रीने उदयबद्दल म्हटलंय.

“प्रिय नवरोबा, आज आपल्या लग्नाला ५ महिने पूर्ण होत आहेत आणि माझ्या आईला जाऊन ४ महिने…. या २० व्या शतकात आपण टिपिकल अरेंज मॅरेज केलं…सगळ्या परिस्थितीत तू मला खंबीरपणे साथ दिलीस…कोणत्याही कंप्लेंट शिवाय मला सांभाळून घेतलास… तुझ्या सारखा निस्वार्थी तूच… कोणताही पुरुषी इगो तू आपल्या नात्यात कधी आणला नाहीस… माझ्या आयुष्यातील एक सगळ्यात प्रेमळ व्यक्ती आहेस तू… सगळ्या परिस्थितीत तू मला कायम हसवलंस… लग्न गडबडीत झालं.. काय झालं कधी झालं कसं झालं… हे मला कळण्याआधी तू मला पूर्ण पणे मला स्वीकारलंस….देवाने मला दिलेलं एक सुंदर गिफ्ट आहेस तू… आय लव्ह यू माय नवरोबा.. खूप फोटो अपलोड करायचे राहून गेलेत… आता सुरुवात करते…Happy 5-month wedding anniversary my dear Navroba,” अशी पोस्ट भाग्यश्री न्हालवेने केली आहे.

पाहा भाग्यश्री न्हालवेची पोस्ट

दरम्यान, भाग्यश्री न्हालवे हिने उदय कुंडपशी २ डिसेंबर २०२५ रोजी लग्न केलं. लग्नानंतर ती पतीबरोबर मलेशियाला गेली होती, तेव्हाच तिच्या आईचं ३० जानेवारी रोजी पुण्यात निधन झालं. तेव्हा तिने भावनिक पोस्ट केली होती. “महाराष्ट्रात नवीन लग्न झालेल्या मुली वर्षभर नवीन नवरी असतात. पहिल्या वर्षातले सगळे सण हे तिचे असतात. नव्याचे नऊ महिनेपण झालं नाही. माझ्या बाबतीत तसं काही घडणार त्याआधीच आई तुझ्या तेराव्याचं जेवण मला जेवावं लागलंय. प्रत्येक घासागणिक तू माझ्या डोळ्यांतल्या पाण्याबरोबर तरंगत होतीस. मनातल्या मनात मी तुला विचारत होते, याचकरता का मला तू सौभाग्यवती केलंस?” असं भाग्यश्री आईच्या निधनानंतर म्हणाली होती.

“माझी आई गेली तेव्हा मी मलेशियात होते. माझ्या आणि तुझ्या शेवटच्या भेटीसाठी झालेली ताटातूट कधीच कोणाला समजणार नाही. जाता-जाता पण तुझ्या या राणूला एक कठीण निर्णय घ्यावा लागला की, माझ्या आईला खूप गार लागतं. जिवंतपणी खूप यातना तू भोगल्यास. तेव्हा तुला तुझ्या शेवटच्या क्षणी मला तुला यातना नाही द्याव्याशा वाटल्या आणि एका क्षणात सगळं मी निमूटपणे स्वीकारलं. कोणी माझा विचारही केला नाही. मला तुला शेवटचं भेटताही येणार नाही, हे ऐकल्यावर मी जमिनीवर कोसळून पडले. आईची शेवटची भेट चुकली, याची खंत घेऊन मला पूर्ण आयुष्य जगावं लागणार आहे. या विचारानं मला अर्धमेल्यासारखं वाटत आहे. आता माहीत नाही पुढे काय होईल,” असं भाग्यश्री न्हालवेने पोस्टमध्ये लिहिलं होतं.