Marathi Actress Dipti Barve : श्रावण सुरू होण्यापूर्वीची अमावस्या महाराष्ट्रात दीप अमावस्या किंवा दीपपूजन अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या दिवशी घरातील समई, पणत्या, निरांजन, दिव्यांची पूजा केली जाते. या दिवशी कणकेचे दिवे लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख-समृद्धी येते अशी धारणा आहे. त्यामुळे, दीप अमावास्येला घरोघरी कणकेचे दिवे बनवून त्यांची पूजा केली जाते. याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री दीप्ती बर्वेने दीप अमावस्येच्या दिवशी उकडीचे मोदक बनवले आहेत. तांदळाच्या पीठाची उकड काढून दीप्तीने अगदी मऊ लुसलुशीत मोदक बनवले आहेत. याची झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. दीप अमावस्येच्या दिवशी घराघरांत कणकेचे दिवे केले जातात पण, मी आज खास मोदक बनवले आहेत असं अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दीप्ती बर्वेची खास पोस्ट

भक्ती चैतन्याचं निरांजन, दिवा देवघरात उजळला, पोटभर सुखाचा…मोदकांचा गोडवा तृप्त मनात विरघळला…दीप अमावास्या दिवशी घरोघरी कणकेचे दिवे केले जातात. पण, मी आज मोदक बनवले अन् देवाकडे प्रार्थना केली.

दीपज्योतिः परब्रह्म , दीपज्योतिर्जनार्दनः
दीपो हरतु मे पापं , दीपज्योतिर्नमोऽस्तुते !!!!

अमंगळ सरो सुमंगल होवो,
जीवनात प्रकाशयोग सातत्याने जुळून येवो…
शुभम भवतु!

भक्ती सुंदर अन् कळीदार असे मोदक बनवल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हे मोदक अभिनेत्रीने केळीच्या पानावर सजवून नैवेद्य दाखवला आहे.

दरम्यान, अभिनेत्री दीप्ती बर्वे गेल्या काही दिवसांपासून गिरनार यात्रेमुळे चर्चेत होती. भर पावसात तिने गिरनार यार पूर्ण केली, याचा खास व्हिडीओ दीप्तीने सोशल मीडियावर शेअर केला होता.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आजवर दीप्ती बर्वेने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘पिंजरा’, ‘हृदय प्रीत जागते’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘अनामिका’ अशा विविध मालिकांमध्ये ती झळकली आहे. आता दीप्तीच्या पावलावर पाऊल ठेवत तिची लेक जुई भागवतनेही कलाविश्वात एन्ट्री घेतली आहे. जुईने ‘झापुक झुपूक’, ‘लाइक अँड सब्सक्राइब’, ‘गुलकंद’ या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.