‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १५ जूनपासून निवेदिता सराफ यांची मुख्य भूमिका असलेली ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये कृष्णाईच्या मोठ्या लेकीची भूमिका अभिनेत्री एकता लब्दे साकारणार आहे. तिचं नाव आहे शारदा. ती समजूतदार, जबाबदार आणि कुटुंबासाठी स्वतःच्या भावनांनाही बाजूला ठेवणारी मुलगी असून, या भूमिकेद्वारे एकता एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या भूमिकेबद्दल एकता सांगते, “मला या भूमिकेच्या ऑडिशनसाठी फोन आला होता…त्यानंतर मी ठाण्यात ऑडिशन दिली. कृष्णाईच्या मुलीच्या भूमिकेसाठी माझी निवड झालीये हे ऐकून मला फार आनंद झाला होता. खूप महिन्यांनंतर मी पुन्हा कॅमेरा फेस करत होते. शूटिंगचा पहिला दिवस खूप छान होता. आज माझ्याकडे काम आहे… यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. फार कमी लोकांना असं भाग्य लाभतं. शूटिंगच्या पहिल्या दिवशी मनात थोडी धाकधूक होती, कारण या भूमिकेसाठी मला कोल्हापुरी भाषेत संवाद साधायचा होता. मुळात मी कोकणातली असल्यामुळे मला भाषेवर काम करावं लागलं. सेटवर सगळे कलाकार आणि दिग्दर्शक इतके कमाल आहेत की ते सगळं समजावून सांगतात आणि सांभाळून घेतात.”

अभिनेत्री पुढे सांगते, “मुंबईच्या बाहेर शूटिंग करणं माझ्यासाठी कठीण आहे. कुटुंबाला सोडून शूटिंगसाठी मुंबईबाहेर राहणं अवघड वाटतं. आमच्या मालिकेचं सुरुवातीचं शूटिंग साताऱ्यात होतं आणि सुदैवाने माझी टीम खूप चांगली आहे. आमचं प्रॉडक्शन हाऊस खूप सपोर्टिव्ह आहे आणि सहकलाकारही कमाल आहेत. त्यामुळे हळुहळू मुंबईबाहेर राहून शूटिंग करणं सोपं वाटू लागलं. माझं, नारायणीचं आणि ट्विंकलचं खूप कमी वेळात छान बॉण्डिंग झालं आहे. आम्ही तिघी सेटवरही सख्ख्या बहिणींप्रमाणे वावरतो. निवेदिता ताई आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतात. पहिल्या दिवशी मला खूप टेन्शन होतं की माझ्यामुळे सीनचे रिटेक्स नको व्हायला. पण सगळे खूप समजूतदार आहेत. मुंबईबाहेर शूट असल्यामुळे एकत्र राहिल्यामुळे आमची खूप छान टीम तयार झाली आहे.”

“निवेदिता ताई कृष्णाईची भूमिका साकारणार आहेत हे समजल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मराठीत निवेदिता ताई आणि हिंदीत नीतू सिंग या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यांचे चित्रपट पाहत मी लहानाची मोठी झाले. अभिनय करण्यासाठी प्रेरणा मला त्यांच्या भूमिकांमधून मिळाली आहे. निवेदिता ताई स्वभावाने सुद्धा खूप छान आहेत. मी त्यांच्याबरोबर सातारा एक्सप्लोर केलं आहे. एक दिवस शूटिंगला सुट्टी होती, तेव्हा आम्ही एकत्र फिरलो, खूप शॉपिंग केली आणि छान वेळ घालवला. एवढ्या उंचीवर पोहोचूनही इतकं सौजन्यशील, समजूतदार आणि प्रेमळ राहणं हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. शारदाची भूमिका साकारताना मी निवेदिता ताईंकडून भरपूर काही शिकून घेणार आहे. आम्ही कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळे त्या आमची अगदी आईसारखी काळजी घेतात.” अशा भावना एकताने व्यक्त केल्या.