Esha Dey Weddding Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा डे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू होती. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ग्रहमख, मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत लवकरच लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती; यानंतर ईशाचा होणारा नवरा नेमका कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले होते. अखेर अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटो आता चाहत्यांसमोर आला आहे.

अभिनेत्री ईशाने लेखक-गीतकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक खणकरशी लग्नगाठ बांधली आहे. यांच्या लग्नातील सुंदर फोटो वनिता खरातने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. वनितासह प्रियदर्शिनी इंदलकर, रोहित माने, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, मकरंद देशपांडे, आकांक्षा गाडे असे सगळे कलाकार ईशाच्या लग्नाला उपस्थित होते.

ईशाने लग्नसोहळ्यात खूपच सुंदर लूक केला होता. लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी, त्यावर सोनेरी काठ असलेली शाल, गळ्यात हार, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या लूकमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत होती. ईशाच्या लग्नातील हे खास क्षण वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ईशाच्या नवऱ्याबद्दल म्हणजेच अभिषेक खणकरबद्दल सांगायचं झालं तर, त्याने ‘खुलता कळी खुलेना’, ‘लक्ष्मी निवास’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांसाठी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय अभिषेकचा ‘६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात’ सुद्धा सन्मान करण्यात आला आहे. त्याने ‘अनन्या’ चित्रपटासाठी लिहिलेल्या “तू धगधगती आग” या गीतासाठी त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

ईशा-अभिषेकवर संपूर्ण मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या लग्नाला अनेक मराठी कलाकार व तिचे जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. या दोघांचा विवाहसोहळा पाचगणीत पार पडला आहे.

esha dey
अभिनेत्री ईशा डे अडकली लग्नबंधनात ( Esha Dey Wedding Photos )

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यासह तिने ‘गुलकंद’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं सुद्धा भरभरून कौतुक करण्यात आलं होतं.