Marathi Actress Gayatri Datar Kelvan Video : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. यांच्या पाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे; तिचं नाव आहे गायत्री दातार. झी मराठीच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे गायत्री दातार घराघरांत लोकप्रिय झाली. आता अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात एक नवीन सुरुवात करत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

गायत्रीने काही दिवसांपूर्वीच आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह खास फोटो शेअर करत सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिल्याचं पाहायला मिळालं. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे श्रीकांत चवरे. सध्या गायत्री ‘सिरियल किलर’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या नाटकाच्या टीमने नुकतंच तिचं थाटामाटात केळवण केलं. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गायत्री दातारच्या केळवणाचा थाट

गायत्री म्हणते, “बेस्ट केळवण…माझ्या आयुष्यातील काही बेस्ट माणसांकडून! आयुष्यात खूप कमी वेळा अशी माणसं भेटतात जी कमी वेळात आपलंसं करून टाकतात. ‘सिरियल किलर’चे आमचे निर्माते, दिग्दर्शक, भाऊ कदम, गौरी, तेजस आणि संपूर्ण टीम अशीच खूप खास आहे. थँक्यू सो मच…प्रणय तेली सर आणि तुमच्या कुटुंबाचेही खूप-खूप आभार! केदार देसाई सरांच्या कुटुंबाचेही आभार. तुम्ही माझ्या केळवणासाठी खरंच खूप सुंदर व्यवस्था केली होती.”

Award Banner

गायत्रीच्या केळवणासाठी तिच्या सहकलाकारांनी अभिनेत्रीच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले होते. अभिनेत्रीसाठी खास मोदक, पुरणपोळी-तूप, फिश फ्राय, घावणे, कोलंबी फ्राय, माशाचं सार, भात असा चमचमीत पदार्थांचा बेत करण्यात आला होता. यावेळी गायत्रीचं सगळ्या सहकलाकारांनी मिळून औक्षण केलं, तिची ओटी भरली. गायत्री ही सगळी व्यवस्था पाहून भारावून गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गायत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री व तिच्या नवऱ्याची ओळख एका डेटिंग अ‍ॅपवर झाली होती. यानंतर हळुहळू दोघांमध्ये छान मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन गायत्री-श्रीकांतने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आता प्रेमाची कबुली दिल्यावर ही जोडी लग्नबंधनात केव्हा अडकणार हे जाणून घेण्यासाठी गायत्रीचे चाहते आतुर झाले आहेत.