Marathi Actress Reel Video : आपले आवडते कलाकार वैयक्तिक आयुष्यात काय करतात, आगामी काळात ते कोणत्या नव्या प्रोजेक्ट्समधून आपल्या भेटीला येणार, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अबोली रंगाचा सिंपल ड्रेस, मोकळे केस या लूकमध्ये ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय. गावी रानावनात फेरफटका मारतानाचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये “सुमा येतेय तुमच्या भेटीला” असं कॅप्शन पाहायला मिळतंय. आता ही सुमा दुसरी-तिसरी कोणीही नसून लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर आहे.
ईशा केसकरचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने ती कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेते. ईशा गेल्या काही वर्षांपासून तिच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेमुळे चर्चेत होती. या मालिकेत तिने कलानिधी खरे ही प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र, ईशाने प्रकृतीच्या कारणास्तव या मालिकेतून एक्झिट घेतली होती. ईशाने मालिका सोडल्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले होते.
आता ईशा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेनंतर नव्या कोणत्या प्रोजेक्टमधून भेटीला येणार? ती पुन्हा मालिका करणार, नाटकात काम करणार की, सिनेमात झळकणार? असे बरेच प्रश्न तिचे चाहते विचारत होते. अखेर ईशाने शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे ती सिनेमात झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला तिने ‘समर्थ’ सिनेमातील “वेडे मन” हे गाणं लावलं आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित असलेला ‘समर्थ’ सिनेमा येत्या १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ईशा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. तिच्यासह या सिनेमात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, हार्दिक जोशी, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, दिशा परदेशी हे कलाकार झळकणार आहेत.
दरम्यान, ईशाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आमची लाडकी इशू…सुमा In समर्थ”, “किती सुंदर दिसतेयस ईशा”, “ईशा तुला नव्या सिनेमासाठी शुभेच्छा”, “बेस्ट ऑफ लक ईशा”, “माय फेव्हरेट ईशा” अशा कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.
