कोकणी माणूस आणि शिमगा यांचं नातं अतूट आहे. मुंबईतील कोकणवासी दरवर्षी वेळात वेळ काढून, सुट्ट्या घेऊन शिमगोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावी जातात. शिमग्याला घराघरांत पालखी येते. पालखी घरी आल्यावर ग्रामदेवतेची ओटी भरून, पूजा करून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. देवाची पालखी खांद्यावर घेऊन ती नाचवण्याची ( खेळे ) ही खास परंपरा सुद्धा कोकणात आहे.
मराठी मनोरंजन विश्लातील अनेक कलाकार मूळचे कोकणातले आहेत. त्यामुळे हे कलाकार सुद्धा शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून कोकणात पोहोचतात. मात्र, यावर्षी अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीला शिमगोत्सव साजरा करण्यासाठी तिच्या गावी जाता आलेलं नाहीये. या अभिनेत्रीचं नाव आहे जान्हवी तांबट.
‘लक्ष्मी निवास’, ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी तांबट आता लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेत जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. ही मालिका १६ मार्चपासून ऑन एअर होईल. सध्या याचं शूटिंग सुरू असल्याने जान्हवीला कोकणात जातं आलेलं नाहीये.
जान्हवीचं गाव आहे चिपळूण. चिपळूणमध्ये दरवर्षी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे संपूर्ण कुटुंब शिमग्याला गावी गेलेलं असताना आपल्याला जाता आलं नाही या भावनेने जान्हवीचे डोळे पाणावले आहेत.
जान्हवी लिहिते, “जेव्हा तुमचं संपूर्ण कुटुंब शिमग्याला गावी जातं आणि तुम्हाला जाता येत नाही…तेव्हा थोडं वाईट वाटतं. हा फक्त एक सण नाहीये…शिमगा म्हणजे आमच्यासाठी एक भावना आहे. अशी भावना जी कायम परंपरेशी जोडून ठेवते. आपण कोण आहोत, कुठे आहोत याची कायम आठवण करून देणारी ही भावना…शिमग्याच्या असंख्य आठवणी आहे. बालपणीच्या आठवणी, अलीकडच्या आठवणी…आपण जसे मोठे होतो तेव्हा एक जाणीव होते ती म्हणजे…जे काही घडतं ते चांगल्यासाठी होतं. आज शिमग्याला जाता आलं नाही पण, या अनुपस्थित राहण्यामागेही एक कारण आहे…” सध्या मालिकेचं शूटिंग सुरू असल्याने जान्हवीला शिमग्याला जाता आलेलं नाहीये. पण, जान्हवी छवीच्या रुपात आता दररोज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये तिला धीर दिला आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेतील जान्हवीचा सहकलाकार संचित चौधरी लिहितो, “अगं पुढच्या वर्षी सगळे जाऊ आता सेटवर मजा करु…ये डान्स करायला”
तर, अन्य नेटकरी म्हणतात, “शरीराने कोकणात नसलीस तरी मनाने तिथेच धाव घेतलीये…पुढच्यावर्षी नक्की जा”, “समजू शकतो काळजी नको करूस पुढच्यावर्षी जा”, “किती गोड…कोकणाची ओढ प्रत्येकाला असतेस आता नाराज नको होऊस”, “न जाण्याचं कारणही चांगलंच आहे मग दु:ख नको”

गेल्यावर्षी जान्हवीने शेअर केलेले शिमग्याचे सुंदर फोटो…
दरम्यान, जान्हवी तांबट आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ‘मी जिंकून घेईन सारं’ ही नवीन मालिका १६ मार्चपासून सायंकाळी सात वाजता प्रसारित केली जाईल.
