Lakshmi Niwas Marathi Serial: ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतल्या नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. अर्ध्या तासाची मालिका पाहणारे आता प्रेक्षक एक तासाची ‘लक्ष्मी निवास’ मालिका आवर्जुन पाहताना दिसतात. मालिकेचं कथानक, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय यांची सांगड उत्तमरित्या झाल्यामुळे ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेमध्ये अभिनेत्री हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, दिव्या पुगांवकर, स्वाती देवल, निखिल राजेशिर्के, मीनाक्षी राठोड, अनुज ठाकरे, तन्वी कोलते अशी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. या सर्व कलाकारांनी आपापली पात्र उत्कृष्टरित्या निभावल्यामुळे लक्ष्मी, श्रीनिवास, भावना, जान्हवी, मंगला, संतोष, जयंत, वीणा, हरीश, सिद्धू अशी सर्व पात्र घराघरात पोहोचली आहेत. भावना व सिद्धूची जोडी मालिकेत अजून जमली नसली तरी प्रेक्षकांचं यांना विशेष प्रेम मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत अमृता देशमुखची एन्ट्री झाली. सई या भूमिकेत अमृता झळकली. त्यानंतर आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्री एन्ट्री झाली आहे.
‘लक्ष्मी निवास’च्या १३ मार्चच्या भागात अभिनेत्री जान्हवी तांबटची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत जान्हवी पूर्वी नावाच्या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. जान्हवीच्या एन्ट्रीचा प्रोमो नुकताच ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, जान्हवी तांबटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती याआधी ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती. या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत, दिप्ती केतकर, सुनील तावडे, भाग्यश्री पवार असे बरेच कलाकार पाहायला मिळाले होते. ‘अबोली प्रीतीची अजब कहाणी’मध्ये जान्हवीची मयुरी भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. याशिवाय जान्हवीने ‘संत गजानन शेगावीचे’, ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जान्हवीने साकारलेली पूर्वी प्रेक्षकांना आवडते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.