मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये जुई गडकरीच्या नावाचाही समावेश आहे. जुईने छोट्या पदड्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय ‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. शिवाय सोशल मीडियावरही जुई बरीच सक्रिय असते. आताही तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेद्वारे तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. कामाबरोबरच जुई तिच्या कुटुंबासाठीही अधिकाधिक वेळ देताना दिसते. तसेच घरामध्येही लागणारा भाजीपाला ती खरेदी करते. आताही भाजी खरेदी करण्यासाठी तिने थेट कर्जत गाठलं होतं. यादरम्यानचाच व्हिडीओ तिने शेअर केला आहे.




आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…
कर्जतमधील शुक्रवारच्या बाजारात जुई चक्क भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जुईने तोंडाला स्काफ बांधलेला दिसत आहे. तर दुचाकीवर ती प्रवास करत आहे. व्हिडीओ शेअर करत जुई म्हणाली, “जे लोक मला ओळखतात त्यांनाच माहित आहे की, भाजी खरेदी करणं मला किती आवडतं”.
“मी कुठेही जाऊन ताजी भाजी खरेदी करु शकते. सकाळी उठून शुक्रवारच्या बाजारामधून ताजी भाजी खरेदी करणं हा एकमेव उत्तम पर्याय आहे. ही रिल बघितल्यानंतर कर्जतमधील उत्साह तुम्हालाही जाणवेल”. कर्जतमधील शुक्रवार या आठवडी बाजारात जुई गेली. पण यावेळी तिने गर्दी टाळण्यासाठी तिचा चेहरा लपवला होता. भाजी खरेदी करण्यावर तिचं किती प्रेम आहे हे या व्हिडीओमधून दिसून येतं.