छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अनेक कलाकारांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने जवळपास दीड वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेत अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी होती. प्रार्थनाच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री काजल काटेने साकारली होती.

‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘मुरांबा’ या मालिकांमुळे अभिनेत्री काजल काटे घराघरांत लोकप्रिय झाली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये काजलने साकारलेलं शेफाली हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं होतं. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

काजलच्या लग्नाला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने तिने खास रोमँटिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काजल लिहिते, “सात वर्ष…असंख्य आठवणी आणि आयुष्यभराचं प्रेम! जेव्हा मी कमजोर होते… तेव्हा माझी ताकद झाल्याबद्दल, जेव्हा मला आशेची गरज होती… तेव्हा माझे हास्य बनल्याबद्दल आणि मला कायम पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…माय लव्ह, आय लव्ह यू सो मच! तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं भाग्य आहे.”

काजलच्या नवऱ्याचं नाव आहे प्रतिक कदम. तो प्रसिद्ध फिटनेस कोच आहे. IPL टीम मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच म्हणून प्रतिक जबाबदारी सांभाळत आहे. काजलही अनेकदा आपल्या पतीसह मुंबई इंडियन्स संघाच्या क्रिकेटपटुंबरोबर एकत्र दिसते. हे दोघंही सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनच्या लग्नाला सुद्धा उपस्थित होते. याशिवाय प्रतिकने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना सुद्धा ट्रेनिंग दिलं आहे.

लग्नाच्या सातव्या वाढदिवसानिमित्त प्रतिकने सुद्धा काजलसाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “तू कायम मला साथ दिलीस आणि माझं आयुष्य सुंदर बनवलंस…या सात वर्षांच्या प्रवासात प्रेम, आनंद आणि असंख्य आठवणी आहेत. लग्नाच्या ७ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…माय लव्ह!”

दरम्यान, या दोघांच्या पोस्टवर प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, गिरीजा प्रभू यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्स करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.