Marathi Actress Kalyani Nandkishor : ‘लागिरं झालं जी’, ‘लाखात एक आमचा दादा’ अशा अनेक मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांना नुकताच मुंबई-सातारा प्रवासादरम्यान एक धक्कादायक अनुभव आला आहे. याबद्दल अभिनेत्रीने सविस्तर व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. पुण्यातील नवले ब्रिजच्या खाली गावगुंडांनी गाडी अडवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असं कल्याणी यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसेच महिलांना त्रास देणाऱ्या या गावगुंडांवर कधी कारवाई होणार? असा सवालही अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये उपस्थित केला आहे.

अभिनेत्री म्हणतात, “नमस्कार, मी अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर…मला तुम्हाला सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे, आजही या महाराष्ट्रात महिला का सुरक्षित नाहीयेत? काल मी मुंबईहून साताऱ्याला येत होते. त्यावेळी पुण्यात नवले ब्रिजच्या खाली चार गावगुंडांनी माझी गाडी अडवली. माझ्या गाडीला ठोकर दिली, स्वत: गाडी ठोकून माझ्याकडूनच पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मी पैसे दिले नाही म्हणून जबरदस्तीने माझा हात खेचला, मला त्यांच्या गाडीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. महिला खरंच सुरक्षित आहेत का? आपल्याकडे महिला उपमुख्यमंत्री असूनही आज महिला सुरक्षित नाहीयेत. मी कलाकार आहे म्हणून मी आज मीडियासमोर, सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकते पण, बाकीच्या महिलांचं काय? मी आज सर्व महिलांसाठी व्यक्त होऊ इच्छिते…या महाराष्ट्रात एकही महिला सुरक्षित नाहीयेत. या गावगुंडांवर कधी कारवाई होणार? माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की, या प्रकरणात त्यांनी लक्ष घालावं आणि त्या गावगुंडांना पकडून आणावं. लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी.”

कल्याणी पुढे सांगतात, “पुण्यातील वडगाव नऱ्हे भागात गावगुंडांचा सुळसुळाट झालाय. जर त्याचवेळी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर त्यांच्या मेडिकल टेस्टमध्ये त्यांनी कोणत्या अंमली पदार्थांचे सेवन केलंय हे सिद्ध झालं असतं. नऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये या गावगुंडांच्या विरोधात मी तक्रार दाखल केली आहे. महिला पोलिस अधिकारी वर्षा देशमुख मॅडम आणि थिटे साहेब यांचे खूप सहकार्य लाभले. त्यांचे खूप खूप आभार. परंतु, ही तक्रार दाखल करण्याची प्रोसेस इतकी मोठी आहे की, तोपर्यंत हे गावगुंड फोन बंद करून कुठल्याकुठे जाऊन लपून पण बसले. आज दुसरा दिवस आहे पण अजून त्यांचा तपास लागला नाही.”

“सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट ही की, त्यांच्या घरचे तक्रार दाखल करू नका म्हणून सेटलमेंट करायला येतात. अरे कुठे विकली लाज…” असं सांगत कल्याणी यांनी संताप व्यक्त केला आहे.