Marathi Actress Kunjika Kalwint : ‘स्वामिनी’, ‘शुभविवाह’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच कुंजिका काळविंट. अभिनेत्रीच्या घरी काही महिन्यांपूर्वीच चिमुकल्याचं आगमन झालं. त्यामुळे कुंजिकाने इंडस्ट्रीतून काही दिवस ब्रेक घेतला होता. आता अभिनेत्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय होऊ लागली आहे. याशिवाय तिने नुकतीच एका मुलाखतीला सुद्धा उपस्थिती लावली होती.
‘स्वामिनी’ मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या कुंजिका काळविंटने अल्पावधीतच सर्व प्रेक्षकांचं मनं जिंकून घेतली. स्वामिनीनंतर कुंजिकाला लीड रोलसाठी एक मालिका ऑफर झाली होती. पण, अचानक तिला रिप्लेस करण्यात आलं. हा अनुभव कुंजिकाने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
कुंजिका म्हणाली, “जेव्हा मला समजलं की आता ‘स्वामिनी’ मालिका बंद होणार आहे…त्याचदरम्यान मी दुसरी एक ऑडिशन दिली होती. त्यात मी सिलेक्ट सुद्धा झाले होते. त्या मालिकेत मी लीड भूमिका साकारणार होते. आता ‘स्वामिनी’ मालिकेत मी नकारात्मक भूमिका साकारल्यामुळे सुरुवातीला मला टाइपकास्ट होण्याची भीती होती. पण, मला दुसऱ्या मालिकेसाठी जेव्हा लीड भूमिका ऑफर झाली तेव्हा मी निश्चिंत होते. कारण, मला ती निगेटिव्ह इमेज बदलण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला असता. पण, काही कारणास्तव त्या दुसऱ्या मालिकेच्या गोष्टी जुळून आल्या नाहीत.”
कुंजिका पुढे म्हणाली, “मी त्या मालिकेसाठी प्रोमो सुद्धा शूट केला होता. पण, ते वर्क झालं नाही… मला रिप्लेस करण्यात आलं. मला रिप्लेस केलंय याची कल्पनाही देण्यात आली नव्हती. तेव्हा मला प्रचंड त्रास झाला होता. त्यानंतर मी बराच वेळ घेतला की, आता मला लीड भूमिकाच करायच्या आहेत, किंवा सकारात्मक भूमिकाच साकारायच्या आहेत…असंही मी ठरवलं होतं. पण, ते जुळून येत नव्हतं. त्यानंतर मग मला जाणवलं…आता आपण जास्त वेळ घालवून चालणार नाही. कारण, मी आधीच इंडस्ट्रीत उशिरा आलेय. वयाच्या २७-२८ व्या वर्षी मी पहिली मालिका केली. त्यामुळे मला तेव्हा थांबून राहणं शक्य नव्हतं. कारण, कितीही नाही म्हटलं तरी मुलीचं वय हे दिसतंच.”
“तेव्हा मी ठरवलं होतं…आता जे काम येईल ते घ्यायचं आणि भूमिका साकारायची. मग, मी ‘चंद्र आहे साक्षीला’ ही मालिका केली. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लागलं. मग, मी ‘ती परत आलीये’ मालिका केली. या मालिकेत सगळे कलाकार माझ्याच वयाचे होते त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या.” असं मत कुंजिकाने व्यक्त केलं.
