सध्या घडीला अनेक मराठी कलाकार हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत असल्याचं पाहायला मिळत आहे. नीना कुलकर्णी, किशोरी शहाणे, मयुरी देशमुख, गश्मीर महाजनी अशा अनेक लोकप्रिय कलाकारांनी हिंदी टेलिव्हिजन गाजवलं आहे. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘छत्रीवाली’ या सदाबहार मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री आता एका हिंदी मालिकेत झळकणार आहे.
या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आहे नम्रता प्रधान. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने ‘Zee TV’च्या ‘गंगा माई की बेटियाँ’ या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतली आहे. नम्रता यामध्ये गंगाची मोठी मुलगी सहाना शर्माची भूमिका साकारणार आहे.
सहाना शर्मा ही भूमिका यापूर्वी अभिनेत्री सृष्टी जैन साकारत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिचं लग्न असल्याने सृष्टीने या मालिकेतून अचानक एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर ही रिप्लेसमेंटची भूमिका नेमकं कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष होतं. अखेर या टीआरपी टॉपर मालिकेत मराठी अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
नम्रता प्रधानने देखील इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या सगळ्या चाहत्यांना दिली आहे. सृष्टीने मालिका सोडल्यावर ‘गंगा माई की बेटियाँ’मध्ये ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ फेम अभिनेत्री रश्मी गुप्ताची एन्ट्री होईल अशा चर्चा सर्वत्र होत होत्या. मात्र, कालांतराने सहानाच्या भूमिकेसाठी नम्रताची निवड झाल्याची अधिकृत माहिती प्रेक्षकांसमोर आली. त्यामुळे आता या रिप्लेसमेंटमुळे प्रेक्षकांना सहानाच्या रुपात नम्रता प्रधान पाहायला मिळेल.
नम्रताचे चाहते सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, ‘गंगा माई की बेटियाँ’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या सिरियलने गेल्या आठवड्यात १.७ TVR नोंदवला आहे. या मालिकेत शुभांगी लाटकर, अमनदीप सिद्धू, वैष्णवी प्रजापति या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
महत्त्वाचं म्हणजे या टीआरपी टॉपर असलेल्या या हिंदी मालिकेचा लवकरच मराठीत सुद्धा रिमेक पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं नाव असेल ‘कृष्णाईच्या लेकी’. यामध्ये लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
