Marathi Actress Namrata Pradhan : ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘छत्रीवाली’ या लोकप्रिय मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नम्रता प्रधान सध्या हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसतेय. ‘Zee TV’च्या ‘गंगा माई की बेटियाँ’ या लोकप्रिय मालिकेत तिने काही दिवसांपूर्वीच एन्ट्री घेतली. गंगाच्या मोठ्या मुलीची भूमिका ती साकारतेय. या मालिकेला टीआरपी सुद्धा चांगला मिळतोय. मराठमोळ्या नम्रता प्रधानला हिंदीत काम करण्याची संधी कशी मिळाली, याठिकाणी काम करण्याचा अनुभव नेमका कसा होता. मराठी व हिंदीत काम करताना नेमका काय फरक जाणवतो याबाबत अभिनेत्री नम्रता प्रधानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

नम्रता प्रधान ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगते, “ज्या गोष्टींच्या मागे मी आजवर धावत होते…त्या गोष्टी मला कधीच मिळाल्या नाहीत. या हिंदी मालिकेच्या ऑडिशनसाठी सुद्धा मला समोरून फोन आला होता. भूमिका चांगली होती, त्यामुळे मी ३-४ ऑडिशन दिल्या…तुम्ही चंदिगढला येणार का? मला विचारण्यात आलं. पण, नंतर समोरून त्यांचा काहीच फोन वगैरे आला नाही. मग, मी जरा फिटनेसकडे लक्ष द्यायचं ठरवलं. त्यानंतर काही दिवस गेले आणि मला अचानक फोन आला…मी तेव्हा माझ्या आत्याकडे गेले होते आणि आम्ही जेवत होतो. उद्या याल का? असं समोरूनच विचारण्यात आलं. रात्री ९:३० वाजता मला फोन आला होता. ते समोरूनही म्हणाले, आम्हाला माहितीये खूप वेळ झालाय पण, जरा अर्जंट आहे.”

नम्रता पुढे म्हणाली, “मी कोणतीच तयारी केली नव्हती. मला जी जागा माहिती नव्हती तिथे मला अचानक जायचं होतं. मग, मी घरच्यांशी बोलले, त्यांनीही होकार दिला. मी थोडंफार जे काही सामान आहे, ते घेऊन निघाले. फक्त त्यांना मी एकच अट घातली की, मला आठवड्याभरात तुम्ही परत पाठवा. पण, ते काही शक्य झालं नाही. मी महिनाभर तिथेच होते. खरं सांगायचं झालं तर, दिग्दर्शक खूप चांगलेत, संपूर्ण टीम मस्त आहे. मलाही सेटवर अनेक गोष्टी शिकता आल्या.”

…अन् फ्लाइट मिस झाली

“या सगळ्यादरम्यान चंदिगढला जाताना माझी फ्लाइट मिस झाली होती. त्यामुळे, मी एअरपोर्टला प्रचंड रडले. आता सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करतील…असे सगळे विचार मनात सुरू होते. पहाटे ५-५:३० ची फ्लाइट होती ती मिस झाली. मग त्यांनी पुन्हा मला आठ वाजताच्या फ्लाइटचं बुकिंग करून दिलं. मी पोहोचले…हातात स्क्रिप्ट आली आणि लगेच शूटिंगला सुरुवात झाली. मॉक शूट, लूक टेस्ट वगैरे काहीच झालं नाही. सगळ्या गोष्टी फार पटकन झाल्या.” असं नम्रताने सांगितलं.

हिंदी Accent विषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, “दिग्दर्शकाने माझ्यावर खूप मेहनत घेतली. त्यामुळे मला सगळं सोपं झालं. माझे बरेचसे मित्रमंडळी हिंदी आहेत, त्यामुळे मोस्टली मला हिंदी बोलायची सवयच होती. याशिवाय माझ्या डोक्यात कायम होतं की, आपल्याला हिंदीतही काम करायचंय. जरा Accent हलला की, दिग्दर्शक स्वत: सांगतात…तू आता नम्रतासारखी बोलते आहेस हा…पण, मला Accent चा असा काहीच इश्यू येत नाहीये.”

“हिंदी आणि मराठीमध्ये काम करताना खूप फरक जाणवतो…विचारांमध्ये फरक आहे, काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. त्यामुळे हा वेगळा अनुभव घेणंही माझ्यासाठी फार गरजेचं होतं.” असं नम्रताने स्पष्ट केलं.