आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर अलीकडेच लग्नबंधनात अडकली. ६ एप्रिलला नंदिताचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला होता. मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यावर आता नंदिताने उत्तराखंड येथील पवित्र त्रियुगीनारायण मंदिरात विधिवत लग्न केलं आहे. सुंदर अशी पोस्ट अन् फोटो शेअर करत नंदिनाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेता विशाल निकम व अक्षया हिंदळकर यांनी सुद्धा याच त्रियुगीनारायण मंदिरात लग्नगाठ बांधली होती. आता नंदिताने देखील पारंपरिक विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नंदिताच्या पतीचं नाव आहे विपुल महागावकर, तो प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.

या लग्नसोहळ्यासाठी नंदिताने अगदी साधा अन् सुंदर लूक केला होता. जांभळ्या रंगाची सुंदर साडी, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, केसात गजरा या लूकमध्ये नंदिता खूपच सुंदर दिसत होती. नंदिता-विपुलच्या या मराठमोळ्या वेंडिंग लूकचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

अभिनेत्री लिहिते, “आपल्या आयुष्यातील काही गोष्टी आपण स्वत: ठरवतो…तर काही गोष्टी विधिलिखित असतात….आणि हा क्षण खरंच त्यापैकीच एक होता. सगळं काही बाजूला ठेवत त्या एका व्यक्तीवर विश्वास ठेवणं कधीच सोपं नसतं…. पण, हे हळुहळ, आपोआपच हे सगळं घडत गेलं…आणि आम्ही दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र यायचं असं ठरवलं. या पवित्र स्थानी जायचं हे स्वप्न कायम उराशी बाळगलं होतं…आणि आज हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आहे. हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील. त्रियुगीनारायण मंदिरात, पवित्र विधींसह विवाहबंधनात अडकणं हा अनुभव मी शब्दातही व्यक्त करू शकणार नाही इतका सुंदर होता. Feeling Blessed!”

नंदिताचे पती विपुल महागावकरबद्दल सांगायचं झालं, तर तो उत्तम नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. ‘पै पैशाची गोष्ट’, ‘उध्वस्त धर्मशाळा’ अशा नाटकांच्या माध्यमातून विपुलने आपली ओळख निर्माण केली आहे.

तर नंदिताबद्दल सांगायचं झालं तर, तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात सुद्धा रंगभूमीवरून झाली होती. यानंतर तिने ‘एलिझाबेथ एकादशी’ सिनेमात काम केलं. स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमुळे तिला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. याशिवाय नंदिताने ‘खारी बिस्किट’, ‘लालबागची राणी’ या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नंदिताने तिच्या पहिल्या लग्नावर भाष्य केलं होतं. पहिल्या लग्नानंतर काही काळातच ती पतीपासून विभक्त झाली होती. आता अभिनेत्रीने आयुष्यात पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात केली आहे.