Marathi Actress Narayani Varne New Home : यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकारांनी हक्काचं घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. या यादीत आता आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, ‘एक महानायक – डॉ. आंबेडकर’ अशा गाजलेल्या मालिकांमधून ही अभिनेत्री घराघरांत पोहोचली, हिचं नाव आहे नारायणी वर्णे. नुकतंच नारायणीने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
नारायणी वर्णेने मुंबईत तिचं हक्काचं पहिलं घर घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, नारायणी अवघ्या १७ वर्षांची आहे. एवढ्या कमी वयात आपलं स्वत:चं घर घेणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडिया वर या अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
लोकप्रिय अभिनेता अथर्व कर्वे नारायणीला आपली बहीण मानतो. तिने घर घेतल्यावर अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
अथर्व लिहितो, “माझी सहकलाकार ते माझी धाकटी बहीण…मी तुझा संपूर्ण प्रवास माझ्या डोळ्यासमोर पाहिलाय. तू आज फक्त १७ वर्षांची आहेस…एवढ्या कमी वयात मुंबईत स्वत:चं घर घेतलंस. हे फक्त तुझं यश नाहीये तर ही तुझी मेहनत आहे. तुझा आज खूप अभिमान वाटतोय. ही तर फक्त सुरुवात आहे.”
नारायणीचं हे नवीन घर १८ व्या मजल्यावर आहे. घराच्या नेमप्लेटसह तिने खास फोटो शेअर केला आहे. या नेमप्लेटवर तिचं नाव, गणपती बाप्पाची मूर्ती, गुलाबाची फुलं असल्याचं पाहायला मिळतंय. नारायणीने नुकताच तिच्या कुटुंबीयांसह या नव्या घरात गृहप्रवेश केला. याचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दरम्यान, नारायणीवर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. साक्षी महाजन, भूमिजा पाटील, अपूर्वा परांजपे यांसह अनेक मराठी कलाकारांनी तिचं कमेंट्समध्ये कौतुक केलं आहे.
