Neena Kulkarni attends Divyanka Tripathi Baby Shower: टेलिव्हिजन विश्वातील लाडकी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर आणि वयाच्या ४१ व्या वर्षी दिव्यांका पहिल्यांदाच आई होणार आहे. नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला तिची ‘ये है मोहब्बतें’ मालिकेतील ऑनस्क्रीन आई आणि दिग्गज मराठी अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी आवर्जून हजेरी लावली होती. या माय-लेकीच्या जोडीला पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओंनी धुमाकूळ घातला असून चाहते या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

दिव्यांका त्रिपाठीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला विवेक व तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्या मित्र-मैत्रिणींनाही या खास प्रसंगाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. सर्वांनी या खास प्रसंगी हजेरी लावून विवेक व दिव्यांकाचा आनंद द्विगुणित केला.

‘ये है मोहब्बतें’ मालिकेत दिव्यांका त्रिपाठीच्या लेकीची भूमिका साकारणारी रुहानिका धवन ही देखील या खास सेलिब्रेशनसाठी आली होती. त्याचबरोबर या कार्यक्रमाला तिची ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतील ऑनस्क्रीन आई आणि ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी खास हजेरी लावली होती. या मालिकेमुळे नीना कुळकर्णी आणि दिव्यांका यांचं नातं खूप घट्ट झालं आहे, जे या सोहळ्यात पुन्हा एकदा दिसून आलं.

पाहा नीना कुळकर्णी यांचा व्हिडीओ

नीना कुळकर्णी यांना दिव्यांका त्रिपाठीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमात पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी या व्हिडीओवर ‘अम्मा’, ‘लूक खूप बदललाय’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया यांच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. लग्नाच्या प्रदीर्घ काळानंतर आणि वयाच्या ४१ व्या वर्षी दिव्यांका आई होणार असल्याने तिचे चाहते आणि सिनेसृष्टीतील कलाकार तिच्यासाठी खूप आनंदी आहेत. तिला व विवेकला या नवीन प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. दिव्यांका त्रिपाठीची प्रसूती जून महिन्यात होणार आहे, तिने स्वतःच याबद्दल माहिती दिली होती.