Marathi Actress Neha Gadre Post : मनोरंजन सिनेविश्वात कार्यरत असणाऱ्या अनेक अभिनेत्री लग्नानंतर करिअरमधून ब्रेक घेऊन आपल्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देतात. बॉलीवूडपासून ते मराठी इंडस्ट्रीपर्यंतच्या अनेक अभिनेत्री गेल्या काही वर्षांत लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री नेहा गद्रेने सुद्धा काही वर्षांपूर्वीच इंडस्ट्री सोडून परदेशी राहण्याचा निर्णय घेतला.
‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमुळे आणि ‘मोकळा श्वास’ या चित्रपटामुळे नेहा गद्रेला एक वेगळी ओळख मिळाली होती. गेल्या काही वर्षांपासून ती अभिनयापासून दूर होती. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ या चित्रपटात तिने कॅमिओ केल्याचं पाहायला मिळालं. नेहाने वैयक्तिक आयुष्यात २ मार्च २०१९ मध्ये तिने ईशान बापटशी विवाह केला. या जोडप्याच्या घरी १० फेब्रुवारी २०२५ रोजी गोंडस मुलाचं आगमन झालं. नेहा गद्रेने तिच्या बाळाचं नाव इवान असं ठेवलं आहे.
नुकताच इवानचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. इवानचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला असला तरी, नेहाने तिच्या लेकाचा पहिला वाढदिवस भारतात साजरा केला आहे. लाडक्या इवानचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले होते. याशिवाय नेहाने लाडक्या लेकासाठी खास पोस्ट सुद्धा लिहिली आहे.
नेहा लिहिते, “माझं गोड बाळ…आज तू एक वर्षांचा झालास. आज मन भरून आलंय, माझ्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. हे संपूर्ण वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं…हा प्रवास खूप सुंदर होता. माझ्या बाळाचं पहिलं हसू, त्याची गोड मिठी, रात्रीची अपूर्ण झोप असे बरेच टप्पे मी अनुभवले. पण, या सगळ्या प्रवासात मी अजून कणखर झालेय…माझ्या बाळाकडे पाहून मला कायम धीर मिळाला…त्याच्यामुळे मातृत्त्वाचा हा सुंदर प्रवास अनुभवता आला…मी आई झाले! माय स्वीटहार्ट…तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्या आयुष्यात तुला कायम आनंद, हास्य मिळो आणि तुला भरपूर प्रेम…तू आयुष्यात कितीही मोठा झालास तरी तुझी आई कायम तुझ्याबरोबर असेल…माझ्यासाठी तू कायम लहान राहशील. तू माझं लहान बाळ आहेस आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहेस.”
दरम्यान, नेहाने या पोस्टसह इवानचे बालपणीचे सुंदर फोटो देखील शेअर केले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

