Marathi Actress praises Rakhi Sawant: ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारत अभिनेत्री नेहा शितोळे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. फुलराणी या भूमिकेत ती या मालिकेत दिसते. याआधी अभिनेत्री खलनायिकेच्या भूमिकेत दिसली आहे.

नेहा शितोळे ‘बिग बॉस मराठीच्या २’ऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वात तिने तिच्या खेळाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. मात्र, ती विजेतेपदापर्यंत पोहोचू शकली नाही. शिव ठाकरे हा या स्पर्धेचा विजेता ठरला. नेहा शितोळे या पर्वात उपविजेती ठरली. आता नेहा शितोळे तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

“तिच्यासारखं वागता येणं अशक्य आहे”

अभिनेत्री नेहा शितोळेने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत नेहा शितोळेने राखी सावंतबद्दल वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली, “मला ती खूप आवडते, मला तिच्याबद्दल आदर आहे; कारण मराठीच्या ज्या सीझनला ती घरात आली होती, त्या सीझनला मला बिग बॉसमध्ये एक टास्क घेऊन जाण्याची संधी मिळाली होती. आधीच्या सीझनमधील आम्ही काही स्पर्धक गेलो होतो.

“आमचा टास्क सुरू होण्याआधी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर आम्ही भेटलो. चहा, कॉफी झाली आणि त्यानंतर टास्क सुरू झाला; तर त्याआधीचा मधला काळ बघितला तर त्या काळात मला राखी सावंत नावाची व्यक्ती व्यवस्थित भेटली.”

“टेलिव्हिजनसाठी काय लागणार आहे, कुठली गोष्ट टीव्हीवर दाखवली जाणार आहे, हे तिला बरोबर माहीत आहे, त्यामुळे त्या-त्या काळात ती तशी वागते. इतरवेळी जेव्हा ती माणूस म्हणून समोर येते, तेव्हा तिच्या काही समस्या आहेत असे मला वाटत नाही.”

“मला असं वाटतं की, कुठल्याच गोष्टीची तमा न बाळगणारी, इतकी मोकळीढाकळी व्यक्ती मी बघितलीच नाहीये. मला हे करता येणार नाही. मला किंवा इतर कुणालाही तिच्यासारखं वागता येणं अशक्य आहे. इतके वेडे चाळे करणं किंवा इतकं वेड जगासमोर आणण्याची हिंमत असणं, हे आपल्याकडे नाही, त्यामुळे ती मला खूप वेगळी वाटते”, असे म्हणत नेहाने राखी सावंतचे कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राखी सावंत ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तसेच बिग बॉस हिंदीच्या पहिल्या तसेच १४ व्या पर्वातदेखील सहभागी झाली होती. राखी सावंत अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.