अलीकडच्या काळात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार मराठीसह हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वाती देवल, मानसी साळवी, गिरीजा प्रभू या मराठमोळ्या अभिनेत्री हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. यांच्या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. तिच्या एन्ट्रीचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.
मराठी मालिकाविश्व गाजवणारी ही लोकप्रिय अभिनेत्री आता हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचं नाव आहे अभिनेत्री निशाणी बोरुले. ‘मुरांबा’ या कौटुंबिक मालिकेतून ती घराघरांत लोकप्रिय झाली होती. निशाणीने यामध्ये खलनायिकेची भूमिका साकारली होती. निगेटिव्ह पात्र असूनही ती घराघरांत पोहोचली. काही महिन्यांपूर्वी ‘मुरांबा’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि आता निशाणीची हिंदीत वर्णी लागली आहे.
निशाणी बोरुले ‘दिलों की राम लीला’ या झी टीव्हीच्या हिंदी मालिकेत झळकणार आहे. ‘दिलों की राम लीला’ ही सिरियल ‘झी मराठी’च्या ‘शुभ श्रावणी’चा मालिकेचा हिंदी रिमेक आहे. या मालिकेत मिश्कत वर्मा आणि आस्था शर्मा या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या दोघांनी अनुक्रमे राम-लीला ही पात्रं साकारली आहेत.
तर, मराठमोळी अभिनेत्री निशाणी बोरुले या मालिकेत ‘नैना’ हे पात्र साकारणार आहे. ती रामच्या शेजारी राहत असते, तिचं रामच्या कुटुंबीयांशी खूप छान नातं असतं. पण, ती नायकाच्या प्रेमात अखंड बुडालेली असते. त्यामुळे भविष्यात नैना आणि लीलाचा आमनासामना प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.
निशाणीने हिंदी मालिकेत एन्ट्री झाल्याचा प्रोमो शेअर करताच नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सुयश टिळक, शिवानी मुंढेकर, ऋतुजा कुलकर्णी, प्राजक्ता परब, विदिशा म्हसकर यांसारख्या अनेक कलाकारांनी निशाणीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘दिलों की राम लीला’ ही मालिका ‘झी टीव्ही’वर रोज रात्री १० वाजता प्रसारित केली जाते.
