Pooja Birari & Soham Bandekar : आदेश व सुप्रिया बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा सोहम आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी यांचा विवाहसोहळा २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात थाटामाटात पार पडला. पूजा-सोहमच्या लग्नाला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. त्यानंतर पूजा-सोहमने मुंबईत सुद्धा एक रिसेप्शन पार्टी ठेवली होती.
आता नुकतीच पूजाने आपल्या नवऱ्यासाठी खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. निमित्त आहे सोहमच्या वाढदिवसाचं…सोहम बांदेकरचा ७ मे रोजी वाढदिवस असतो. म्हणून पूजाने या दोघांचे गोड फोटो शेअर करत सोहमसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
पूजा बिरारी लिहिते, “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा सोहम बांदेकर! माझ्या आयुष्यात तू एकमेव असा आहेस…जो मला कधीही चिडवू शकतो, मला सगळ्या गोष्टीत दिलासा देऊ शकतोस आणि मला मनसोक्त हसवू शकतोस. माझ्या आयुष्यातील तू ‘Once In A Lifetime Human’ आहेस. तुझ्या मिठीत मी नेहमीच पूर्णपणे हरवून जाते. मी माझ्या फोनकडे पाहून वेड्यासारखी हसत असते आणि यामागचं गोड कारण तू आहेस. तुझ्यावर मी आयुष्यभर असंच प्रेम करत राहीन…अगदी जाहीरपणे आणि शेवटपर्यंत! आता मी तुझं एवढं कौतुक केलंय…पण, तरीही माझ्या रोजच्या eye-roll workout साठी ( डोळे फिरवणं ) ६० टक्के तूच जबाबदार आहेस. माय पगलू, Pookie…तुला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!”
पूजाच्या पोस्टवर सोहमने कमेंट करत “Thank you for Everything” असं म्हटलं आहे. तसेच यापुढे त्याने, ‘लव्ह आणि Evil Eye’ इमोजी दिले आहेत. पूजाच्या पोस्टवर नीना कुलकर्णी, सानिका बनारसवाले, विशाल निकम यांसारख्या कलाकारांनी सुद्धा खास कमेंट करत सोहमला शुभेच्छा दिल्या आहे.
या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सोहम ‘ठरलं तर मग’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि आता येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या ‘पाठराखीण’ मालिकांचा निर्माता आहे. त्यांच्या प्रोडक्शनची ‘ठरलं तर मग’ मालिका गेली साडेतीन वर्षे टीआरपीमध्ये अधिराज्य गाजवत आहे. तर, पूजा सध्या स्टार प्रवाहच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरी ही मुख्य भूमिका साकारत आहे.
