Marathi Actress Pooja Sawant : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिने आजवर वेगवेगळ्या चित्रपटांमधून आपलं अभिनय कौशल्य प्रेक्षकांना दाखवलं आहे. अभिनयाबरोबरच पूजाच्या सौंदर्य आणि डान्सचेही अनेक चाहते आहेत. पूजा सावंत ही मूळची कोकणातली असून, सिंधुदुर्गमध्ये तिचं गाव आहे. पूजा अनेकदा वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये तिचं कोकणावरचं प्रेम व्यक्त करत असते.

अशातच कोकणी असल्याचा एक खास किस्सा तिनं शेअर केला आहे. कोकणी असल्यानं पोलिसांनी तिला सोडून दिलं होतं, असा एक खास किस्सा पूजानं शेअर केला आहे. याबद्दल पूजा नेमकं काय म्हणालीय? चला जाणून घेऊ…

सध्या पूजा तिच्या आगामी ‘सालबर्डी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं पोलिसाची भूमिका साकारली आहे. याचनिमित्तानं तिनं काही दिवसांपूर्वी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी तिला कधीतरी सिग्नल तोडल्यामुळे किंवा काही चूक झाल्यामुळे पोलिसांनी पकडलं आहे आणि पूजा सावंत आहे हे ओळखताच त्यांनी सोडून दिलंय, असं झालंय का, हा प्रश्न विचारला.

“सिग्नलवर लक्ष गेलं नाही आणि…”

या प्रश्नाचं उत्तर देत पूजा म्हणाली, “अभिनेत्री पूजा सावंत आहे म्हणून जा, असं कधीच झालं नाही. मी तसं कधी केलंसुद्धा नाही. पण, मी जेव्हा सुरुवातीला गाडी चालवायला शिकले होते तेव्हा सगळं लक्ष गाडी चालवण्यावर होतं. त्यामुळे सिग्नलवर लक्ष गेलं नाही आणि त्या दिवशी माझ्याकडून सिग्नल तोडला गेला आणि मला पकडलं गेलं. तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं.”

“सावंत नाव वाचताच पोलिसांनी…”

पुढे ती म्हणाली, “पकडल्यानंतर पोलिसांनी माझं लायसन्स (परवाना) पाहिला आणि त्यावरचं सावंत नाव वाचलं. सावंत वाचताच त्यांनी मालवणीत ‘सावंत… अगं… कुठची सावंत आहेस तू?’ असं म्हटलं. त्यावर मी त्यांना ‘काका मी कोकणातली, सिंधुदुर्गची आहे’ असं म्हटलं. त्यावर त्यांनीसुद्धा ‘अरे, तू आमचीच पोरगी आहेस. जा… जा…’, असं म्हटलं होतं. त्यामुळे पूजा सावंत म्हणून नाही तर कोकणातली आहे म्हणून एकदा सोडून दिलं होतं.”

दरम्यान, पूजानं आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटामधील पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. पी. आय. मनोरमा प्रधान, असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. तिच्या या भूमिकेची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. १७ एप्रिल रोजी ‘सालबर्डी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.