‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे अभिनेत्री रसिका सुनील घराघरांत पोहोचली. वैयक्तिक आयुष्यात ऑक्टोबर २०२१ मध्ये रसिकाने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी लग्नगाठ बांधली. हे दोघंही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांचा विवाहसोहळा गोव्यात पार पडला होता. लग्नानंतर रसिका भारतात तर, तिचा नवरा आदित्य कामानिमित्त अमेरिकेत असतो. या दोघांचं लाँग डिस्टन्स मॅरेज आहे. अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भावना व्यक्त केल्या आहेत.
“आदी ( आदित्य ) एकदम मस्त आहे आणि आता लाँग डिस्टन्स मॅरेजची सवय झालीये. आता हे टेन्शन आहे की, तो जेव्हा सोबत येईल राहायला तेव्हा एकत्र राहताना काय प्रॉब्लेम्स येतील असं रसिकाने हसत-हसत सांगितलं. लाँग डिस्टन्सचं अजिबात टेन्शन नाहीये असं तिने मनमोकेळपणाने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
लाँग डिस्टन्स मॅरेजला आता पाच वर्ष पूर्ण होतील…हे सगळं कसं मॅनेज केलंस याचा मूलमंत्र काय? याबद्दल सांगताना रसिका पुढे म्हणाली, “आमची मैत्री, रिलेशनशिप, लग्न सगळंच लाँग डिस्टन्स आहे. त्यामुळे आम्हाला लाँग डिस्टन्सची फार आधीपासून सवय होती. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही एकमेकांबद्दल खूप जास्त Secure आहोत. त्यामुळे टचवूड आमच्या नात्यात यावरून कधीही अडचणी निर्माण झालेल्या नाहीयेत.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “जेव्हा आम्हा दोघांना एकमेकांची खूप जास्त गरज असते…तेव्हा आम्ही एकमेकांबरोबर असू याची आम्ही खूप जास्त काळजी घेतो. त्यावेळी मग माझं हे काम आहे…ते काम आहे असं आम्ही करत नाही. जेव्हा खरंच गरज असते तेव्हा आम्ही एकमेकांना खूप जास्त वेळ देतो. याशिवाय आम्ही दोघंही सतत व्हिडीओ कॉलवर बोलत असतो. तो सकाळ उठल्यापासून ते रात्री मी झोपेपर्यंत… एकंदर दोन्ही देशातील वेळांचं गणित जुळवून आम्ही खूप व्हिडीओ कॉलवर बोलतो. त्याला माहितीये की, तो माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे…आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगत असतो. कधी-कधी छोटेमोठे मतभेद होतात. पण, सगळं छान चाललंय.”
“मला आदी ( आदित्य ) वेळच देत नाही वगैरे हा माझा कधीच मुद्दा नसतो. मी फार कशाचाही तणाव घेत नाही…माझ्या आयुष्यात असा जोडीदार आहे ज्याच्यावर मी डोळे झाकून पूर्ण विश्वास ठेऊ शकते. त्यामुळे खरंच काही अडचणी येत नाहीत.” असं रसिकाने सांगितलं. आता येत्या ऑक्टोबर महिन्यात या दोघांच्या लाँग डिस्टन्स लग्नाला पाच वर्षे पूर्ण होणार आहेत.
