गेले काही दिवसांत मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता येत्या नवीन वर्षातही मराठी कलाविश्वातील काही कलाकार मंडळी लग्नबंधनात अकडणार आहेत. त्यापैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रसिका वखारकर.
कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेतून रसिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची एक अपडेट शेअर केली. अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर करीत लग्न करणार असल्याची चाहत्यांना माहिती दिली. नुकताच तिचा साखरपुडाही पार पडला आहे.
रसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शुभांकर उंबराणी, असं आहे. रसिकानं नुकतीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजेच शुभांकरची अशोक सराफ यांच्याशी भेट घालून दिली. रसिका सध्या कलर्स मराठीवरील अशोक मा. मा. या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तिच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफही मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे रसिकानं तिच्या या नात्याविषयी पहिल्यांदा अशोक सराफ यांनाच सांगितलं.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रसिका आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं त्यांच्या नात्याविषयी सांगितलं. यावेळी अभिनेत्री म्हणाली, “अशोक मामा ही सेटवरील पहिली व्यक्ती होती, ज्यांना मी माझ्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. आमच्याबद्दल त्यांना सांगितल्यानंतर मी शुभांकरची त्यांच्याशी भेट घडवून दिली.”
त्यानंतर रसिकाचा होणारा नवरा शुभांकर म्हणाला, “मला तो दिवस अजून आठवतोय. अशोक सराफ हे व्यक्ती म्हणून कसे आहेत, याबद्दल मला आधी काहीच कल्पना नव्हती. सेटवरून घरी जाण्याआधीच काही वेळ आमची भेट झाली. तर मला तेव्हा असं वाटलं की, ते फक्त पाच मिनिटं वगैरे भेटतील. कारण- ते तितके व्यग्र असतात; पण ते भेटल्यानंतर माझा त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढला. कारण- त्यांनी मला तितका वेळ दिला. ते माझ्याशी अर्धा तास बोलले. काय करतो, कसा आहेस अणि इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. जवळजवळ अर्धा-पाऊण तास आम्ही गप्पा मारत होतो. शेवटी त्यांना मला कडकडून मिठीही मारली.”
त्यानंतर तो म्हणाला, “अशोक सराफ यांच्याइतका बिझी माणूससुद्धा माझ्यासाठी थांबला, मला वेळ दिला. मी फक्त रसिकाचा होणारा नवरा आहे म्हणूनच नाही; पण व्यक्ती म्हणूनही त्यांनी माझी भेट घेतली. कारण- रसिकाचा नवरा म्हणून ते फक्त औपचारिकता म्हणून पाच-दहा मिनिटेही भेटू शकले असते; पण तसं काही झालं नाही. सेटवर मी पहिल्यांदा त्यांनाच भेटलो. ती खूपच सुंदर भेट होती.”
दरम्यान, अशोक सराफ यांच्या घरी निवेदिता यांनी रसिका अणि शुभांकरचं पहिलं केळवणही केलं. या केळवणाचा खास व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता.
