गौरी-गणपतीचा सण म्हणजे कोकणातील प्रत्येक माणसासाठी जिव्हाळ्याचा विषय. रस्त्याला कितीही ट्राफिक असो किंवा ट्रेनला कितीही गर्दी असो गणपतीच्या सणाला सगळे चाकरमानी आवर्जून कोकणात जातात. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सुद्धा मूळचे कोकणातले आहेत. त्यामुळे सणासुदीला, शूटिंगला सुट्ट्या असल्या की हे कलाकार सगळ्यात आधी गावची वाट धरतात. यंदाही अनेक कलाकार बाप्पाच्या स्वागतासाठी गावी पोहोचले होते. तर, काही जणांना शूटिंगच्या व्यग्र शेड्यूलमुळे गावी जाता आलं नाही. या सगळ्यात लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव वेळात वेळ काढून गावी पोहोचली आहे.
रुचिरा चिपळूणची आहे. गेल्यावर्षी ती अवघ्या एका दिवसात बाप्पाचं दर्शन घेऊन मुंबईला परतली होती. यंदाही रुचिरा फक्त २ दिवसच कोकणात गेल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसच होते…त्यातही सगळीकडे फिरायचं होतं असं सांगत रुचिराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोकणातून मुंबईत परतल्यावर तिचेही डोळे पाणावले होते. ती लिहिते, “आज हा रील व्हिडीओ मी मुंबईतल्या घरी बसून शेअर करतेय…आणि आताही मन भरून आलंय आणि डोळ्यात पाणी आहे. गौरी गणपतीचा आमचा सण…गेल्यावर्षी एक दिवसाची ट्रिप होती, यावेळी मी दोन दिवसांसाठी गेले होते. आईचं नटणं आणि गौराईला सजवणं, बाबांना मनसोक्त एन्जॉय करताना बघणं, सुंदर निसर्ग, मी स्वतः बनवलेला उकडीचा मोदक, श्री क्षेत्र सोमेश्वर आणि श्री क्षेत्र परशुराम मंदिरात दर्शन…माझ्या चुलत भावंडांसह घालवलेला सुंदर वेळ; मला सगळं दोन दिवसांतच करायचं असतं. प्रत्येक क्षण अनुभवायचा असतो. प्रत्येक आठवण मनात साठवायची असते…आणि मग वर्षभरासाठी पुरतील इतक्या सुंदर आठवणी घेऊन परत मुंबईला यायचं असतं.”

रुचिराने या व्हिडीओमध्ये तिच्या गावच्या कौलारू घराची, घरातून दिसणाऱ्या सुंदर निसर्गरम्य वातावरणाची, गावच्या गौरी-गणपतीच्या सणाची, भजनाची, श्री क्षेत्र परशुराम मंदिर आणि श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिराची झलक दाखवली आहे.
रुचिराने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अशाचप्रकारे कायम गणपतीला कोकणात जा असंही अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिला सांगितलं आहे.
