Kamali Fame Actress Sai Kalyankar Daughters Name : ‘कमळी’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा विविध मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री सई कल्याणकर खऱ्या आयुष्यात अलीकडेच आई झाली आहे. अभिनेत्रीला १० मार्च २०२६ रोजी कन्यारत्न झालं आहे. लेकीच्या जन्मानंतर काही दिवसांनी सईने ही आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
आता लेकीला सव्वा महिना झाल्यावर सईने तिचं बारसं केलं आहे. अभिनेत्रीने तिच्या चिमुकल्या लेकीचं नाव काय ठेवलंय जाणून घेऊयात…
सईने तिच्या चिमुकल्या लेकीसह आणि पतीसह खास फोटो शेअर केला आहे. मात्र, यामध्ये अभिनेत्रीने तिच्या मुलीचा चेहरा रिव्हिल केलेला नाहीये. या तिघांच्या फॅमिली फोटोच्या बॅकग्राऊंडला सईने तिच्या मुलीचं नाव काय ठेवलंय हे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. नभ आणि इंद्रधनुष्याने साकारलेल्या डिझाइनमध्ये ‘नभा’ असं लिहिलंय. अर्थात सईने तिच्या लाडक्या लेकीचं ‘नभा’ हे दोन अक्षरी नाव ठेवलंय. लेकीच्या नावानुसारच अभिनेत्रीने बारशाला सुंदर सजावट करून घेतली होती.
“प्रेम आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या लेकराचं नाव जाहीर करत आहोत…नभा!” असं कॅप्शन सईने या फोटोंना दिलं आहे. नभा हे दोन अक्षरी नाव अतिशय गोड असून, याचा संबंध निसर्गाशी आहे. नभाचा अर्थ आकाश, गगन ( Sky/Heaven) असा होतो. या नावावरून विशालता, मुक्तता आणि निर्मळता सूचित होते.
खरंचर, अलीकडच्या काही दिवसांत पालक आपल्या मुलांची कधीही न ऐकलेली, अतिशय कठीण नावं ठेवत असल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, या ट्रेंडनुसार न जाता सईने आपल्या लेकीचं फारच गोड नाव ठेवल्यामुळे चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिचं कौतुक केलं आहे.
सई कल्याणकरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लग्नानंतर ४ वर्षांनी आई झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ती लग्नबंधनात अडकली होती. तिच्या पतीचं नाव आहे प्रशांत चव्हाण. अभिनेत्रीच्या पतीने नॅनो केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केली आहे. सईने आजवर ‘कमळी’ मालिकेसह ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘कमळी’ मालिकेत ती हृषीच्या वहिनीची म्हणजेच राधिकाची भूमिका साकारत आहे.
