अलीकडच्या काळात अनेक लोकप्रिय कलाकार टेलिव्हिजनवर कमबॅक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोनाली खरे, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी अशा बऱ्याच कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. अशाचप्रकारे आता नुकत्याच सुरू झालेल्या ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत सुद्धा एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. विविध मराठी मालिकांमध्ये सोज्वळ, लाडक्या सुनेची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आता खलनायिका होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘स्टार प्रवाह’वर नुकतीच सुरू झालेली ‘आनंदी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांकडून होत असलेल्या कौतुकाच्या वर्षावात आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असून, कथेला नवं वळण देणारी शलाका ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही महत्त्वाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री सई रानडे साकारणार असून तिच्या एन्ट्रीमुळे ‘आनंदी’ मालिकेतील नाट्य आणखी रंगतदार होणार आहे.

शलाका ही प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची मेहुणी आहे. युगंधरची दिवंगत पत्नी समिधा आणि तिची बहिण शलाका या जुळ्या बहिणी असतात. मात्र, या दोघींचेही स्वभाव पूर्णत: भिन्न आहे. समिधा सालस, शांत आणि सर्वांना आपलसं करून घेणारी असते, पण शलाका तेवढीच उथळ, स्वतःच्या रूपाचा आणि पैशाचा अभिमान मिरवणारी आहे. युगंधरने शलाकाची निवड न करता समिधाची पत्नी म्हणून निवड केली याची सल शलाका मनात बाळगून आहे. युगंधरला नेस्तनाबूत करणं हाच तिच्या आयुष्याचा उद्देश आहे. याचसाठी पैशाच्या जोरावर शलाकाने सुद्धा गार्मेंट व्यवसायात आपलं साम्राज्य उभं केलं आहे. जोवर युगंधर संपत नाही तोवर रंगीबेरंगी कपडे न घालता केवळ काळ्या रंगाचे कपडे परिधान करणार हे शलाकाने ठरवलं आहे. म्हणूनच ती मालिकेत फक्त काळ्या रंगाचे कपडे वापरताना दिसेल.

Award Banner
sai ranade
अभिनेत्री सई रानडे साकारणार शलाकाची भूमिका

शलाकाच्या आगमनानंतर ‘आनंदी’ मालिकेतील नातेसंबंध, संघर्ष आणि नाट्य अधिक तीव्र होणार आहे. आता शलाका आणि युगंधर यांच्यातील संघर्ष कसा रंगतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, ‘आनंदी’ ही मालिका रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते.