मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच सई रानडे. तिने ‘वहिनीसाहेब’मध्ये साकारलेली जानकीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने सईने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने बॉडी शेमिंग, मैत्री, रिजेक्शन तसेच इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं आहे.

सई रानडे ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “इंडस्ट्रीमध्ये तुमच्या बाह्यरुपावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आता याला मी चुकीच्या पद्धतीने घेणार नाही. कारण, अनेकदा एका विशिष्ट पात्रासाठी अशा-अशा शरीरयष्टीची किंवा अशा-अशा रंगाची व्यक्ती अपेक्षित असेल आणि मी त्यात फिट होत नसेन तर, आपण मी तशी का दिसत नाही? यासाठी स्वत:ला दोष देऊन काहीच उपयोग नाहीये. इंडस्ट्रीत सुरुवातीला मला तुझं कपाळ खूप मोठं आहे, तुझा हा दात वाकडाच आहे, तुझे डोळेच मोठे आहे…असं बोललं गेलं. तेव्हा मग असं वाटायचं अरे आपल्यात खूप त्रुटी आहेत, आपण कसं काय करणार…पण, आता असं वाटत नाही.”

सई पुढे म्हणाली, “आता माझं असं झालंय की, मला आहे तसं स्वीकारा…मी जशी आहे तसं काम द्यायचंय तर द्या, अन्यथा माझा संघर्ष सुरूच आहे…मी दुसरीकडे काम शोधेन. बरं दुसरीकडे मला काम मिळेल सुद्धा कारण, मी स्वत:ला प्रुव्ह करत राहीन. या सगळ्या गोष्टींचा निश्चितच आपल्यावर परिणाम होत असतो कारण, आपणही शेवटी माणूस आहोत. वजन कमी करणं हा जणू आयुष्याचा एक भागच आहे.”

“वजन घटवण्यासाठी विविध प्रकारचं डाएट, व्यायाम सगळं करून झालंय. पण, एका क्षणानंतर मी ठरवलं..मी कशी दिसते यापेक्षा माझ्या शरीराची Strength मेंटेन ठेवण्यासाठी मला स्वत:वरती काम करायचं आहे.” असं सई रानडेने सांगितलं.

दरम्यान लहानपणापासूनच सईला अभिनयात रस होता. ती सुरुवातीला मॉडेलिंग करायची. ‘वहिनीसाहेब’ ही सईची पहिलीच मालिका होती. या मालिकेत तिने जानकी किर्लोस्कर ही भूमिका साकारली होती. यानंतर ती ‘कस्तुरी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली. ‘बंड्या आनी बेबी’, स्पंदन (२०१२), पकडा पकडी (२०११) आणि लक्ष्मी तुझ्याविना (२०१४) या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. तसेच ‘तारा फ्रॉम सातारा’ या हिंदी मालिकेतही ती झळकली होती.