Marathi Celebrity Couple Marriage Ritual Started : गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली. नुकताच ‘फ्रेशर्स’मालिका फेम अभिनेता सिद्धार्थ खिरीड लग्नबंधनात अडकला. त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतल्या ऋत्त्विक तळवलकरसुद्धा लग्नबंधनात अडकला. अशातच आता यात आणखी एक कलाकार जोडी सामील होणार आहे.
या महिन्यातदेखील अनेक कलाकार आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे. या महिन्यात दोघे लग्नबंधनात अडकणार असून, आता त्यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे.
साक्षीच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्याबद्दलची एक सोशल मीडिया पोस्टसुद्धा तिने शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या घरी घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचा फोटो साक्षीनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तर अथर्व कर्वेचं घरसुद्धा लग्नासाठी सजलं आहे. त्यानंसुद्धा घराला केलेल्या आकर्षक रोषणाई आणि सजावटीचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
साक्षी-अथर्व यांच्या लग्नाला अवघे तीन दिवस उरले आहेत. अशा आशयाची पोस्टही अर्थवने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. साक्षी-अथर्व यांचा रोमॅंटिक फोटो शेअर करीत त्यावर ‘3 Days To Go’ असं लिहिलेलं आहे. त्यामुळे साक्षी-अथर्व ६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्याच वर्षी एका मुलाखतीत साक्षीनं २०२६ मध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी साक्षीनं अथर्व कर्वेबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचं जाहीर केलं. दोघांनी त्यांच्या नावावरून #साATh असा युनिक हॅशटॅगदेखील करून घेतला आहे.

साक्षी महाजन ही स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील कलाकारांनी तिचं सेटवर खास केळवणदेखील साजरं केलं होतं. अशातच आता अभिनेत्री अथर्वबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.

