Marathi Serial Actors Marriage : गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजनविश्वात लग्नसराई सुरु आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. अनेकांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केलीय. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या स्टार प्रवाहच्या मालिकेतील अभिनेत्रीच्या घरीही गेले दोन दिवस लग्नाची लगबग सुरु होती. अशातच आता अभिनेत्री अखेर लग्नबंधनात अकडली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे साक्षी महाजन.
काही दिवसांपूर्वीच ‘फ्रेशर्स’ मालिकेमधील अभिनेता सिद्धार्थ खिरीड लग्नबंधनात अडकला. त्यानंतर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतल्या ऋत्त्विक तळवलकरनेसुद्धा लग्नगाठ बांधली. अशातच आता साक्षी महाजनसुद्धा लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने अथर्व कर्वे या अभिनेत्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. अथर्वसुद्धा मराठीसह हिंदी मालिकाविश्वातला लोकप्रिय अभिनेता आहे.
अभिनेत्रीच्या घरी गेले तीन-चार दिवस लग्नाची लगबग सुरू होती. तिने घाणा आणि बांगड्या भरण्याच्या सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर हळदी आणि संगीत सोहळादेखील मोठ्या आनंदाने पार पडला. अशातच आज (६ फेब्रुवारी) रोजी साक्षी आणि अथर्व यांनी एकमेकांबरोबर साताजन्माची गाठ बांधली आहे.
साक्षी आणि अथर्व यांनी लग्नात खास लुक केला होता. साक्षीने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर साजेसे असे दागिने असलेला लुक केला होता आणि अबोली रंगाची गुलाबं तिने केसांत माळली आहेत. तर अथर्वने तिच्या साडीला साजेसा कुर्ता, त्यावर धोतर आणि डोक्यावर टोपी असा खास लुक केला आहे. दोघे या लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.

साक्षी आणि अथर्व यांच्या या लग्नातील खास क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल फोटो-व्हिडीओवर कमेंट्समधून चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. दोघांनी त्यांच्या नावावरून ‘साATh’ असा युनिक हॅशटॅगदेखील करून घेतला आहे. त्यांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी खास हजेरी लावली होती.
दरम्यान, दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झाल्यास, दोघांची पहिली भेट ही ‘विठू माऊली’ मालिकेच्या सेटवर झाली होती. याच मालिकेच्या सेटवर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर मग प्रेमात झालं आणि ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघे आता लग्नबंधनात अडकले आहेत.
