मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी २०२६ या नव्या वर्षात १ जानेवारीपासून नवे संकल्प केले आहेत. काही कलाकारांनी यंदा भूमिकेची निवड करण्याआधी सारासार विचार करायचा असं ठरवलंय. काहींनी नव्या वर्षात शक्य होईल तेवढं फिरून घ्यायचं असा संकल्प केला आहे. तर, अनेकांनी या नव्या वर्षात फिट राहण्यासाठी पहिल्या दिवसापासून फिटनेस चॅलेंज स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा असाच एक संकल्प सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? तिने काय संकल्प केलाय जाणून घेऊयात…

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सानिका काशीकरने नव्या वर्षात ७५ दिवसांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे. सानिकाने आजवर ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘काव्यांजली’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये तिने साकारलेली लीलाच्या सासूबाईंची भूमिका प्रत्येकाच्या पसंतीस उतरली होती. ही मालिका संपल्यापासून सानिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे फोटोशूट, Daily Vlogs सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.

सानिकाने १ जानेवारी २०२६ पासून ७५ दिवसांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे. या चॅलेंजमध्ये अभिनेत्री ६ नियमांचं काटेकोरपणे पालन करणार आहे. यामध्ये दररोज ४५ मिनिटं Indoor व्यायाम, ४५ मिनिटं Outdoor वर्कआऊट यामध्ये स्पोर्ट्स, विशिष्ट किलोमीटर चालणं याचा समावेश असेल.

Award Banner

सानिका काशीकरच्या ७५ दिवसांच्या वर्कआऊट चॅलेंजचा तिसरा नियम आहे दररोज नॉन-फिक्शन पुस्तकाच्या १० पानांचं वाचन करणं, तिच्या रुटिनचा चौथा नियम आहे कमीत-कमी ३.८ लिटर पाणी पिणं, पाचवा नियम आहे डाएट फूड आणि कोणतंही व्यसन करू नये. यामुळे अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती स्ट्रॉबेरी सॅलड, स्मुदी, सीझनल फळं खात असल्याचं पाहायला मिळत आहे.

सानिकाच्या वर्कआऊट चॅलेंजचा शेवटचा निवय आहे मेडिटेशन करणं. मन प्रसन्न अन् स्थिर ठेवण्यासाठी मेडिटेशन करणं महत्त्वाचं समजलं जातं. यामुळेच अभिनेत्रीच्या ७५ दिवसांच्या चॅलेंजमध्ये मेडिटेशन हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे.

दरम्यान, सानिका आता ७५ दिवस या सगळ्या सहा नियमांचं पालन करून तिचं वर्कआऊट चॅलेंज पूर्ण करणार आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच तिच्या या 75Days च्या वर्कआऊट प्रवासाला मराठी कलाकारांसह चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.