‘कौन बनेगा करोडपती’ या शोची लोकप्रियता घराघरांत आहे. साधारण २६ वर्षांपूर्वी या शोचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यावेळी पहिले ‘करोडपती’ ठरले होते हर्षवर्धन नवाथे. हा शो जिंकल्यावर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. आताच्या घडीला त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे. हर्षवर्धन यांनी वैयक्तिक आयुष्यात मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली आहे. हर्षवर्धन यांच्या पत्नीचं नाव सारिका नवाथे असून त्यांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
सारिका नवाथे यांनी आजवर बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय त्यांनी मराठी सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कमळी’ मालिकेत हृषीच्या आईची म्हणजेच नयनतारा इनामदार ही भूमिका साकारत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘मोलकरीण बाई’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. टेलिव्हिजनवर सुपरहिट ठरलेल्या ‘अवघाचि संसार’ या मालिकेत सुद्धा त्या झळकल्या होत्या.
नुकतीच सारिका नवाथे यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना हर्षवर्धन नवाथे यांच्याबद्दल विचारण्यात आलं. यावर सारिका म्हणाल्या, “हर्षवर्धन एका बहुचर्चित शोचे विजेते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या शोची लोकप्रियता ही केवळ महाराष्ट्रात नसून संपूर्ण देशभरात आहे. त्यामुळे अर्थात अनेकजण बहुचर्चित शोच्या पहिल्या विजेत्याची बायको म्हणूनही मला ओळखतात. कधी-कधी नक्कीच असं वाटतं की, माझी या पलीकडेही ओळख आहे. कारण, मी सुद्धा बरंच काम केलेलं आहे. पण, हर्षवर्धन यांचा मला निश्चितच अभिमान आहे. त्यामुळे मी या सगळ्या चर्चा लाइटली घेते. फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं, याकडे माझं लक्ष असतं.”
हर्षवर्धन यांनी काही वर्षांपूर्वी ‘इ टाइम्स’ला मुलाखत दिली होती यावेळी ते म्हणाले होते की, त्यांना IAS अधिकारी व्हायचं होतं…पण शोनंतर संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. या कार्यक्रमामुळे त्यांना एक व्यासपीठ मिळालं. शिक्षणासाठी फार मोठं कर्ज घ्यावं लागलं नाही… यानंतर ते UK ला गेले आणि त्यांनी MBA पूर्ण केलं.
दरम्यान, सारिका नवाथे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. पती अन् कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो त्या इन्स्टाग्रामवर शेअर करतात.
