Marathi Actress reveals about Accident: शलाका पवारने आतापर्यंत मालिका-नाटकांतून विविध भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तू चांदणे शिंपित जाशी, तू पण मी पण, बॉस माझी लाडाची, का रे दुरावा या मालिकांतील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.
आता अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या व्यावसायिक, तसेच खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य केले. विविध मालिकांमध्ये काम करताना आलेला अनुभव, नाटकांचे दौरे व इंडस्ट्रीमधील मित्र-मैत्रिणी, फु बाई फूचे किस्से,प्रशांत दामले व अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव, समीर चौघुलेंबरोबरची मैत्री अशा अनेक गोष्टींबद्दल तिने वक्तव्य केले. त्याबरोबरच अभिनेत्रीने तिच्या अपघाताबद्दलही खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली, ते जाणून घेऊ…
कसा झालेला अभिनेत्रीचा अपघात?
शलाका पवारने राजश्री मराठीला मुलाखत दिली. शलाका पवारला या मुलाखतीत विचारले गेले की, असा कधीही प्रसंग आलाय का, की तुला तुझं दुखणं बाजूला सारून पुढे जावं लागलं. त्यावर अभिनेत्रीने तिच्याबरोबर नुकताच घडलेला प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “माझा नुकताच एक अपघात झाला होता. माझ्या पायाला १८ टाके पडले होते. मी मुंबईवरून दादरला चालले होते. मी स्कुटीवर होते. जे डंपर्स असतात, त्यातून काहीतरी रॉड पडला. तो रॉड रस्त्यावर पडून उडाला आणि माझ्या पायात गेला. त्यामुळे माझा पाय फाटला नशीब माझ्या हाडाला लागलं नाही. फ्रॅक्चर झालं नाही; पण टाके पडले. “
अभिनेत्री पुढे म्हणाली, “‘हीच खरी फॅमिलीची गंमत’ या नाटकाचे लगेचच प्रयोग होते. माझी इच्छाशक्ती होती. मला वाटत होतं की, त्या भूमिकेत मीच काम करावं. संतोष लगेच माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी भूमिका देऊ शकतो. आमचा पुढचा प्रयोग अडत नाही. कारण- कोणी ना कोणी उभ राहतं आणि आमचा प्रयोग पुढे जातो पण माझी इच्छा होती की, मीच काम करावं. डॉक्टर म्हणाले की तुम्ही चाललात, उभे राहिलात, तर तुम्हाला त्रास होईल; पण आम्ही सगळं ते मॅनेज केलं. माझे सहकलाकार मला धरायचे किंवा मला बसवायचे. मी नाटकात चालायचे नाही, बसूनच काम केलं.”
प्रेक्षकांना अपघात झाल्याचं कळलं का? त्यावर अभिनेत्री म्हणाली, “हो, कारण माझ्या पायाला बँडेज होतं, ते दिसत होतं; पण माझ्या पायाला लागलं हे सांगितलं नाही. असं काही सांगितलं की, लोकांचं लक्ष जातं”, असे म्हणत पायाला १८ टाके पडले असताना नाटकात काम केल्याची आठवण तिनं सांगितली.
