Sharmishtha Raut: लोकप्रिय अभिनेत्री, निर्मिती शर्मिष्ठा राऊतने अलीकडेच आनंदाची बातमी दिली. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर शर्मिष्ठा आई झाली. तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. जिचं बारसं मोठ्या थाटामाटात नुकतंच पार पडलं. या बारशाचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

शर्मिष्ठा राऊतच्या लाडक्या लेकीच्या बारशाला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री खुशबू तावडे पती संग्राम साळवीबरोबर पाहायला मिळाली. तसंच अभिनेत्री हर्षदा खानविलकर शर्मिष्ठाच्या चिमुकल्या लेकीची नजर काढताना दिसली. याशिवाय ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील कलाकार मंडळी देखील शर्मिष्ठाच्या मुलीच्या बारशात पाहायला मिळाले. बारशाच्या निमित्ताने तिची लोकप्रिय मालिका ‘हे मनं बावरे’चं रियूनियन झालं. याचे व्हिडीओ खूप चर्चेत आले आहेत. शर्मिष्ठानं लेकीचं नाव ‘रुंजी’ ठेवलं आहे.

‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना शर्मिष्ठा राऊत म्हणाली, “मला खूप खूप भारी वाटतंय. आपण म्हणतो ना, शादी का लड्डू खाकर ही देखो. तसंच बाळ ही आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट आहे की, ते झाल्यावरचं त्याची खरी किंमत कळते. कायम असं होत होतं की, माझं एक बाळ घरी आहेच, माझी मांजर चिकू. मला दुसऱ्या बाळाची खूप गरज होती. तेजस आणि मी सतत म्हणायचो, तो क्षण आपल्या आयुष्यात परत कधी येईल. तर तो आला. मी खूप एन्जॉय केलं आणि काम करत एन्जॉय केलं. मधे थोडा ब्रेकही घेतला होता.”

पुढे शर्मिष्ठाचा पती तेजस देसाई म्हणाला की, मला माझी मुलगी डॅडीज गर्ल पाहिजे. हिला मी सरळ सांगितलं होतं, मुलगी नाही झाली तर तू परत घरी जा. त्यावर शर्मिष्ठा हसत म्हणाली, हो. याने मला धमकी दिलेली, मुलगी झाली नाही तर माहेर जायचं. पुढे तेजस म्हणाला, “मला मुलगीच हवी होती. आम्ही तीन महिने तिला घरी मनी हाक मारायचो. आता रुंजी माझ्या हातात होती तेव्हा माझे मिक्स इमोशन होते.”

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतचं लग्न लॉकडाऊनदम्यान ऑक्टोबर २०२०मध्ये झालं होतं. तिनं तेजस देसाईबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर शर्मिष्ठा व तेजस आई-बाबा झाले आहेत.