आपल्या मुलांनी आयुष्यात शिकून खूप मोठं व्हावं, त्यांनी अभिमानास्पद कामगिरी करावी अशी प्रत्येक आई-बाबांची इच्छा असते. मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी कामात कितीही व्यग्र असले, तरीही घरी असलेल्या मुलांकडे त्यांचं व्यवस्थित लक्ष असतं. काही सेलिब्रिटींची मुलं आई किंवा बाबांप्रमाणे सिनेविश्वातच सक्रिय झाली आहेत. तर, काही कलाकारांच्या मुलांनी आपल्या पालकांपेक्षा वेगळं करिअर निवडलंय. सेलिब्रिटींच्या मुलांपैकी कुणी डॉक्टर आहे, कुणी टिचिंग फिल्डमध्ये सक्रिय आहे, तर कुणी कंटेट क्रिएटर आहे. अशाच एका लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुलाच्या प्रोफेशनविषयी सांगितलं आहे.
लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री शीतल शुक्ल या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, सिनेमा तसेच टेलिव्हिजन मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. शीतल शुक्ल यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने कायमच सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. मात्र, आता त्या त्यांच्या मुलामुळे चर्चेत आल्या आहेत.
शीतल शुक्ल यांचा मुलगा नेटफ्लिक्समध्ये कार्यरत आहे. तसेच आलिया भट्टच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अल्फा’ सिनेमाची पटकथा शीतल यांच्या मुलाने लिहिलीये. पहिल्यांदाच ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना ऑन कॅमेरा शीतल शुक्ल यांनी आपल्या मुलाबद्दलचा खुलासा केला आहे.
शीतल शुक्ल म्हणाल्या, “माझा मुलगा नेटफ्लिक्समध्ये आहे. आलिया भट्टचा ‘अल्फा’ सिनेमा त्यानेच लिहिला आहे. त्याचं नाव आहे सौमिल शुक्ल. धर्मा प्रोडक्शनचा जो ‘सरजमीन’ सिनेमा होता…तो सुद्धा त्यानेच लिहिला होता. त्यावेळी माझा मुलगा धर्मा प्रोडक्शनमध्ये होता आणि आता तो नेटफ्लिक्समध्ये कार्यरत आहे.”
दरम्यान, अभिनेत्री शीतल शुक्ल यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आता त्या आजपासून ( १० ऑगस्ट ) सुरू झालेल्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत महत्त्वपूर्ण साकारणार आहेत. त्यांच्या भूमिकेचं नाव आहे ललिताबाई नाईक. यामध्ये शीतल शुक्ल, ऐश्वर्या नारकर, अमृता धोंगडे, पूजा ठोंबरे, अतुल काळे, हे कलाकार झळकणार आहेत. दरम्यान, ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाते.
