‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेला गेल्या दीड वर्षांत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. यासह यंदाच्या वर्षी ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात ‘महाराष्ट्राची महामालिका’ होण्याचा बहुमान सुद्धा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेला मिळाला आहे. मात्र, आता नुकतीच या मालिकेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट प्रेक्षकांसमोर आली आहे. या मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. या अभिनेत्रीने स्वत: पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्याच्या जिवलग मैत्रिणीची म्हणजेच अनिशाची भूमिका अभिनेत्री शिवानी बने साकारत होती. पण, आता इथून पुढे ही अभिनेत्री आपल्याला मालिकेत दिसणार नाहीये. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवानीने मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती सर्वांना दिली आहे. काव्या आणि पार्थ अनिशाला प्रेमाने ‘खारुताई’ अशी हाक मारायचे. म्हणूनच शिवानी पोस्टच्या सुरुवातीलाच “खारुताईचा प्रवास संपला” असं म्हटलं आहे.
शिवानी भावुक होत लिहिते, “खारुताईचा’ सुंदर आणि सुखकर प्रवास मला संपवावा लागला. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत ‘अनिशा’ ही भूमिका मी साकारली आणि तुमचं प्रेम मला मिळालं. मैत्री करावी तर ती अनिशा आणि काव्या सारखीच असे असंख्य मेसेज मला यायचे आणि तुम्हा प्रेक्षकांच्या अशा कमेंट्स सुद्धा असायच्या. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनिशा असावी अशी माझी देखील इच्छा आहे आणि जर तुमच्या आयुष्यात अनिशा नसेल तर ती नक्कीच मिळेल! आमच्या संपूर्ण टीमला आणि आमच्या मालिकेच्या सगळ्या फॅनपेजेसना धन्यवाद! तुमच्यामुळे माझा हा १ वर्षाचा प्रवास खूप छान झाला….असो पण हा प्रवास जरी संपला असला तरीही मी लवकरच तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे आणि असंच प्रेम मला तुमच्याकडून मिळेल अशी आशा आहे. तुमची खारुताई!”
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या चाहत्यांनी शिवानीच्या या पोस्टवर कमेंट्स करत तिला पुढीला वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय मालिकेत, “आम्ही अनिशाला खूप मिस करू” असंही म्हटलं आहे.
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये ज्ञानदा रामतीर्थकर, मृणाल दुसानिस, विजय आंदळकर, विवेक सांगळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
