अलीकडच्या काळात प्रत्येक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. साखरपुडा- लग्न असो, प्रेग्नन्सीची गुडन्यूज असो किंवा आयुष्यातील कोणतीही खास गोष्ट…हे सगळे कलाकार इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त करतात.
मराठी मालिकाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लवकरच आई होणार असल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. अभिनेत्रीने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने बेबी बंप फ्लॉन्ट करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे श्रुती अत्रे.
‘कलर्स मराठी’च्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेमुळे श्रुती घराघरांत लोकप्रिय झाली होती. यामध्ये तिने खलनायिका राजश्री ढाले पाटीलची भूमिका साकारली होती. यानंतर ती ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत पाहायला मिळाली. याशिवाय श्रुतीने ‘बापमाणूस’, ‘बन मस्का’ या मालिकांमध्येही काम केलेलं आहे. आता लवकरच अभिनेत्री आई होणार आहे.
श्रुतीच्या पतीचे नाव अश्विन असं आहे. त्यांचा लग्नसोहळा २०१९ मध्ये पार पडला होता. अभिनेत्रीने प्रेग्नन्सीचे फोटो शेअर करत त्यावर सुंदर असं कॅप्शन देखील लिहिलं आहे.
“यंदाचा मातृदिन माझ्यासाठी वेगळा आहे. आमचं कुटुंब आता मोठं होणार आहे आणि ही गोड बातमी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा प्रवास सोपा नव्हता… या प्रवासात प्रचंड अडचणी आल्या, काही भीतीचे क्षण होते. पण, या सगळ्यात आमच्याबरोबर तुम्हा सर्वांचं प्रेम कायम होतं. प्रत्येक आईला आणि लवकरच आई होणाऱ्या प्रत्येक महिलेला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! एक नवीन सुरुवात…मातृत्व, मदर्स डे स्पेशल…” अशा भावना श्रुतीने पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सध्या संपूर्ण मालिकाविश्वातून श्रुतीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आहे. सौरभ चौघुले, अक्षया नाईक, नम्रता संभेराव, योगिता चव्हाण, प्रसाद जवादे, मनिराज पवार, ऋचा आपटे अशा अनेक कलाकारांनी श्रुती अत्रेच्या पोस्टवर कमेंट करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.