Marathi Actress Shubhangi Sadavarte Announces Second Marriage: ‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची घोषणा केली. आता शुभांगी दुसरं लग्न करत आहे. तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचा केळवणाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुभांगीने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिच्या होणाऱ्या पतीचे नाव सुमित म्हशेळकर आहे. शुभांगी व सुमित यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांचं केळवण केलं. दोघांनीही या केळवणाचे सुंदर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. घटस्फोटानंतर शुभांगी आयुष्यात पुन्हा एकदा नवी सुरुवात करतेय, त्यासाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘जुळली गाठ गं’ असं कॅप्शन शुभांगीने केळवणाच्या व्हिडीओला दिलं आहे. यात ते त्यांच्या मित्र-मैत्रिणींना भेटतात. मग त्यांनी शुभांगी व सुमितसाठी केलेली सजावट पाहायला मिळतेय.

पाहा व्हिडीओ-

सुमित म्हशेळकरने शेअर केला व्हिडीओ

सुमित म्हशेळकरने ‘नवराई माझी नवसाची’ असं कॅप्शन लिहून सरप्राइज केळवण प्लॅन करण्यासाठी मित्र-मैत्रिणींचे आभार मानले. सुमित व शुभांगी दोघांनीही शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, शुभांगी सदावर्ते हिचं हे दुसरं लग्न आहे. तिचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओक यांच्याशी झालं होतं. शुभांगी व आनंद यांनी २०२० मध्ये करोना काळात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते. पण पाच वर्षांच्या संसारानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून घटस्फोटाची घोषणा केली होती. घटस्फोटाच्या घोषणेनंतर अवघ्या तीन महिन्यांत शुभांगीने दुसरं लग्न करत असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

काय म्हणाले होते आनंद ओक?

“मी आणि शुभांगीने काही वर्षांपूर्वीच परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे स्वीकारण्यास आम्हालाही थोडा वेळ लागला पण, आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आली आहे. आम्ही जे क्षण एकत्र घालवले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. याचबरोबर मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. ती उत्तम अभिनेत्री आणि खूप चांगली व्यक्ती आहे. भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही एकत्र काम करत राहू…,” असं आनंद ओक यांनी म्हटलं होतं. काही वर्षांपूर्वीच वेगळे झाल्याचं आनंद ओक म्हणाले होते, पण शुभांगी व त्यांचा घटस्फोट नेमका केव्हा झाला, त्याबद्दल जास्त माहिती दिली नव्हती.

शुभांगी सदावर्ते ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. तिने ‘संगीत देवबाभळी’ या नाटकात आवलीची भूमिका केली आहे. तसेच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतही शुभांगीने काम केलं होतं. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातही ती झळकली होती.