‘संगीत देवबाभळी’ या गाजलेल्या मराठी नाटकात काम करणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळेच चर्चेत आहे. शुभांगीने मागच्या आठवड्यात सुमित म्हशेळकरशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर शुभांगी पतीबरोबर जेजुरीला गेली. सुमित म्हशेळकरने जेजुरी दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

शुभांगी सदावर्ते व सुमित म्हशेळकर लग्नानंतर जेजुरीला गेले. सुमित शुभांगीला उचलून जेजुरी गडाच्या पायऱ्या चढला. दोघांनी भंडारा उधळला आणि खंडोबा रायाचे आशीर्वाद घेतले, तसेच फोटो काढले, असं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. शुभांगी व सुमितच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्स करत आहेत.

‘येळकोट येळकोट जय मल्हार’, असं कॅप्शन देऊन शुभांगी सदावर्तेच्या पतीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Award Banner

पाहा व्हिडीओ-

मराठी सिनेविश्वात अनेक कलाकारांची लगीनघाई सुरू आहे. याचदरम्यान शुभांगीने पहिल्या घटस्फोटाची घोषणा केल्यावर अवघ्या तीन महिन्यांत दुसरं लग्न केलं. शुभांगीचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओक यांच्याशी झालं होतं. आनंद ओक यांनी ‘संगीत देवबाभळी’ला संगीत दिलं होतं.

शुभांगी सदावर्तेचा पहिला घटस्फोट

शुभांगी सदावर्ते व आनंद ओक यांनी २०२० मध्ये करोना काळात लग्न केलं होतं. पण अचानक पाच वर्षांनी सप्टेंबर २०२५ मध्ये आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ते व शुभांगी विभक्त झाले आहेत, असं सांगितलं. यामुळे आनंद व शुभांगीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

“प्रिय मित्रांनो, मी आणि शुभांगीने काही वर्षांपूर्वीच परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे स्वीकारण्यास आम्हालाही थोडा वेळ लागला पण, आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आली आहे. आम्ही जे क्षण एकत्र घालवले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. याचबरोबर मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. ती उत्तम अभिनेत्री आणि खूप चांगली व्यक्ती आहे. भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही एकत्र काम करत राहू, जसं आम्ही यापूर्वीही एकत्र काम केलेलं आहे,” असं आनंद ओक यांनी म्हटलं होतं.

महिनाभरापूर्वी शुभांगी सदावर्तेने केळवणाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर काही दिवसांतच तिने सुमित म्हशेळकरशी दुसरं लग्न केलं. आता दोघांनी जेजुरीला दर्शन घेतले.