Sneha Wagh: ‘नीरजा एक नई पहचान’, ‘ज्योती’ आणि ‘वीरा’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघने आता अध्यात्माची वाट धरली आहे. वैयक्तिक आयुष्यात स्नेहाने बराच त्रास सहन केला. तिने दोन लग्ने केली आणि दोन्ही वेळा तिचे घटस्फोट झाले. स्नेहा सध्या तिच्या कामात व्यग्र आहे. त्याचबरोबर ती तिचा बहुतांश वेळ मुंबईऐवजी म्हापसा (मथुरा) आणि वृंदावन येथे घालवते. स्नेहा सध्या ‘महादेव अँड सन्स’ या टीव्ही मालिकेत काम करतेय. या मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्ताने लखनऊमध्ये तिने सांगितलं की, श्रीकृष्णाच्या शरणात आल्यानंतर तिचं आयुष्य बदललं.
‘ई-टाइम्स’शी बोलताना आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल स्नेहा म्हणाली, “एक काळ असा होता जेव्हा माझा कोणावरही विश्वास नव्हता. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वार्थी आहे असं मला वाटायचं. त्याच वेळी मी अध्यात्माचा मार्ग निवडला, त्यामुळे देवाशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं.”
पहिल्यांदा वृंदावनला केव्हा गेली स्नेहा वाघ?
स्नेहाने वृंदावनला पहिल्यांदा जाण्याचा योग आला, तेव्हाची आठवण सांगितली. एका मंदिरातून तिला बोलावण्यात आलं होतं. सुरुवातीला हा काही फसवणुकीचा प्रकार असावा असं वाटलं. पण त्या प्रवासाने तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. “अवघ्या तीन दिवसांत माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला जाणवलं की मी मुंबई राहण्यायोग्य नाही. तिथे राहून भगवान श्रीकृष्णाची भक्ती करण्यात मला खूप शांती मिळाली. मला श्रीकृष्णाकडून ते निस्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम मिळाले, ज्याच्या शोधात मी कित्येक दिवसांपासून होते,” असं स्नेहा वाघ म्हणाली.
आता माणसांसोबतच्या नात्याची गरज नाही – स्नेहा वाघ
स्नेहा वाघ पुढे म्हणाली, “मला आता कोणत्याही माणसासोबत नात्यात राहण्याची गरज वाटत नाही, कारण भगवान श्रीकृष्णाने माझ्या मनातील प्रत्येक पोकळी भरून काढली आहे. मी सध्या इतकी समाधानी आहे की या स्थितीतून मला बाहेर पडायचंच नाही. मी खूपच समाधानी आणि चांगल्या स्थितीत आहे.”
तिसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली स्नेहा वाघ?
आता लग्न करणं हे स्नेहाचं प्राधान्य नाही. पण याचा ती कधीच लग्न करणार नाही असा नाही. “मी लग्न करणारच नाही, असा निर्णय घेतलेला नाही. पण एक मर्यादा नक्कीच ठरवून घेतली आहे. माझं लक्ष आता लग्नावर नाही. जेव्हा तुमचं लक्ष त्याकडे नसतं, तेव्हाच तुम्ही आयुष्यात पुढे जाता. भविष्यात कदाचित माझं लग्न होऊही शकतं, त्याबद्दल खात्रीने काही सांगता येत नाही,” असं स्नेहा वाघ म्हणाली.
स्नेहा वाघचे दोन घटस्फोट
स्नेहा वाघने दोन विवाह केले, पण दोन्ही नाती घटस्फोटाने संपली. तिने पहिलं लग्न १९ व्या वर्षी अभिनेता आविष्कार दारव्हेकर याच्याशी केलं होतं, पण त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१५ मध्ये स्नेहाने इंटीरियर डिझायनर अनुराग सोलंकीशी दुसरं लग्न केलं, वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी स्नेहाने दुसऱ्या पतीवर मानसिक छळ आणि शोषणाचे आरोप केले होते.
