‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील जीवा म्हणजेच अभिनेता विवेक सांगळेचं इन्स्टाग्राम अकाऊंट काही दिवसांपूर्वीच अचानक बंद झालं. यामुळे विवेकने लाखो फॉलोअर्स गमावले…यानंतर विवेकने एक नवीन सुरुवात करत पुन्हा एकदा नवीन इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं. असाच अनुभव आता आणखी एका मराठी अभिनेत्रीला आला आहे. या लोकप्रिय अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आपली खंत व्यक्त केली आहे. यासह तिने देखील एक नवीन सुरुवात करत आपल्या नव्या इन्स्टाग्राम अकाऊंटची माहिती चाहत्यांना दिली आहे.

‘भाग्य दिले तू मला’, ‘स्वामिनी’, ‘तू ही रे माझा मितवा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री सुरभी भावे घराघरांत पोहोचली. सुरभीचं इन्स्टाग्राम अकाऊंट २ आठवड्यांपूर्वी अचानक बंद झालं. काही तांत्रिक बाबींमुळे हे अकाऊंट बंद झाल्याचं सुरभीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

सुरभी म्हणते, “नमस्कार मी सुरभी भावे काही तांत्रिक अडचणींमुळे माझं पूर्वीचं इन्स्टाग्राम अकाउंट हे बंद झालेलं आहे. त्यामुळे मी नव्या युजरनेमने दुसरं अकाउंट सुरू केलंय. पुन्हा एकदा नव्याने इन्स्टाग्रामच्या प्रवासाला सुरुवात…आयुष्यात आता सोशल मीडिया समजायला लागलं होतं आणि अचानक इन्स्टाग्रामने माझं अकाउंट पूर्ण बंद केलं. २ आठवडे वाट पाहिली पण काहीच झालं नाही… १५००० फॉलोअर्स गमावले. पण, हिंमत गमावली नाही. आयुष्यात अनेक वेळा शून्यापासून सुरू केलंय. त्यामुळे कशाला घाबरायचं असं म्हणून आज नव्याने इन्स्टाग्राम अकाउंट ओपन केलं आहे. आधी जसं प्रेम केलंत, त्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या नवीन अकाउंटवर कराल अशी खात्री आहे.”

Award Banner

दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी असंख्य कमेंट्स करत तिला पाठिंबा दिला आहे. “आम्ही तुम्हाला नक्की सपोर्ट करू आणि खूप प्रेम देऊ” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या पोस्टवर आल्या आहेत.

सुरभीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील तू ही रे माझा मितवा या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचं नाव आहे वल्लरी पाटील. सुरभीसह यामध्ये शर्वरी जोग, अभिजीत आमकर, आशुतोष गोखले, रुपल नंद या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.