Swati Deval Pregnancy Struggle : मराठीसह हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच स्वाती देवल. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘लक्ष्मी निवास’ ते हिंदी सिरियल ‘मनपसंद की शादी’ अशा विविध गाजलेल्या मालिकांमध्ये स्वातीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पण, अभिनेत्रीचा कलाविश्वातील सुरुवातीचा प्रवास सोपा नव्हता. संघर्ष, मेहनत करून तिने आज एवढं यश मिळवलं आहे. ही सगळी स्वामींची कृपा असल्याचं स्वाती आवर्जून सांगते.

स्वाती देवलने नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “लग्नानंतर वर्षभराने मला दिवस गेले. तेव्हा एक प्रॉब्लेम झाला होता…खरंतर, ही खूप खासगी गोष्ट आहे. मला सातव्या महिन्यातच डिलिव्हरी करून घ्यावी लागली होती. बाळाचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्यावेळी मी ‘रेतीवाला’ गाण्याच्या शूटिंगला गेले होते. डान्स, उड्या मारणं झालं होतं…त्याचा मला भयंकर त्रास झाला. तो काळ खरंच खूप जास्त त्रासदायक होता. मला शारीरिक वेदना होत होत्या, मानसिक खच्चीकरण झालं. कामं मिळत नव्हती…तो काळ फार वाईट होता. त्यावेळी असं वाटलं होतं सगळं सोडून द्यावं…मूलबाळ झाल्यावर पुन्हा छान नोकरी करावी.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “पहिल्या बाळाच्या वेळेस असं झालं पुढे, दुसरं-तिसरं पण अबॉर्शन झालं. मला यादरम्यान, खरंच खूप त्रास झाला होता. ती संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी खूप वाईट आणि त्रासदायक होती. पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला जेव्हा समजलं की, असा-असा प्रॉब्लेम आहे तेव्हा तुषार कॉमेडी एक्स्प्रेस शो करत होता. तर त्यावेळी तुषार ‘वॉटर किंगडम’ला शूट करत होता आणि डॉक्टरकडे मी एकटीच गेले होते. डॉक्टरांनी मला सांगितलं की, बाळंतपण करावं लागेल…समस्या आहेत. मग, तुषारला कसं सांगायचं या सगळ्याचा विचार करून मला खूप वाईट वाटलं होतं. दुसऱ्या अबॉर्शनच्या वेळेला सुद्धा मी एकटीच घरात होते आणि मी एकटीच डॉक्टरकडे जाऊन आले होते. दुसऱ्यावेळी पण तुषार शूटिंगला होता. यात त्याची काहीच चूक नाहीये. कारण, खरंच त्याला येता यायचं नाही.”

“तिसऱ्यावेळी अबॉर्शन झालं तेव्हा तुषार खूप रडला होता. आम्हाला दोघांनाही बाळाची खूप इच्छा होती. आपल्या बाबतीत असं का होतंय असंही वाटलं. खरंतर, त्यानंतर मग माझ्या मनात प्रेग्नन्सीची भीती बसली होती. मग थोडे महिने मी नीट कामाकडे लक्ष दिलं आणि मग चान्स घेतला.” असं सांगत स्वाती देवलने आपल्या भावना व्यक्त केल्या.