Marathi Actress Uma Hrishikesh : ‘स्वामिनी’, ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकांच्या माध्यमातून अभिनेत्री उमा हृषिकेश घराघरांत पोहोचली. अल्पावधीतच उमाला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. मात्र, काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री परदेशात शिफ्ट झाली. ती मध्यंतरी सोशल मीडिया, युट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होती. पण गेल्या वर्षभरापासून उमाने सोशल मीडियापासूनही दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. वैयक्तिक आयुष्यात एंडोमेट्रिओसिस आजाराचं निदान झाल्यावर तिने आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं असं ठरवलं. हा संपूर्ण अनुभव उमाने पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

उमा लिहिते, “श्री स्वामी समर्थ! सर्वात आधी, तुम्ही सगळ्यांनी मला ज्या प्रेमळ शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार! आज तुम्हा सर्वांबरोबर मी काही गोष्टी शेअर करू इच्छिते. सध्या मी न्यूझीलंडमध्ये आहे आणि याठिकाणी मी माझं दुसरं मास्टर्स पूर्ण करतेय. ( Masters in Applied Business with a specialisation in Human Resource Management ) याचबरोबर मी तिथे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीही करत आहे. नोकरी आणि अभ्यास-शिक्षण या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं खरंच कठीण होतं म्हणूनच या धावपळीत, ‘कंटेंट क्रिएशन’कडे साहजिकच थोडं दुर्लक्ष झालं. शिक्षण आणि व्यावसायिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता.”

अभिनेत्री पुढे लिहिते, “याचा अर्थ असा नाही की, कंटेंट तयार करण्याची माझी आवड कमी झालीये. आता मी पुन्हा एकदा कंटेट क्रिएशन सुरू करेन…लवकरच मी युट्यूब (YouTube) आणि इन्स्टाग्रामवर कमबॅक करणार आहे. माझा प्रवास आणि माझे अनुभव मी या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.”

“काही महिन्यांपूर्वी माझ्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. ‘एंडोमेट्रिओसिस’चं (endometriosis) निदान झाल्यामुळे मला तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. मासिक पाळी आल्यावर मला खूप त्रास व्हायचा, त्या वेदना कमी करण्यासाठी मी गोळ्या-औषधं घेत होते यामुळे अनेकदा मला टीकेचा, गैरसमजाचा सामना करावा लागला. काही लोकांचं असंही म्हणणं होतं की, “स्त्रियांनी वेदना सहनच केल्या पाहिजेत” पण, नंतर मला समजलं की मुळात हा ‘एंडोमेट्रिओसिस’चा त्रास होता. या अनुभवामुळे मला एक महत्त्वाची गोष्ट समजली…समोरची व्यक्ती कोणत्या संघर्षातून जात आहे हे माहीत नसतानाही आपण अनेकदा त्यांच्याबद्दल लगेच मत बनवतो किंवा टीका करतो. त्यामुळे थोडा सहानुभूतीने विचार करणं गरजेचं आहे. कारण, एखादी व्यक्ती नक्की कोणत्या परिस्थितीतून जातेय, हे आपल्याला कधीच पूर्णपणे माहीत नसतं.” असं उमाने सांगितलं.

“आपलं आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे…याची मला पूर्णपणे जाणीव झाली आहे. सध्या माझं पूर्ण लक्ष माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या सुधारणेवर आहे. माझा नवरा हृषिकेश याने मला या संपूर्ण प्रवासात खूप साथ दिली. आयुष्य अशाप्रकारे बदलेल याचा मी कधीच विचार केला नव्हता….मी या सगळ्यासाठी कृतज्ञ आहे. आता मी जीवनात अधिक शांत आणि संयमी झालेय. आपण लवकरच भेटुयात…तोपर्यंत स्वत:ची काळजी घ्या. खूप-खूप प्रेम!” अशी पोस्ट उमाने शेअर केली आहे.

दरम्यान, उमाने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय तिला काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे.