scorecardresearch

“आजारी असताना सलाईन लावून…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं सिनेसृष्टीतील कटू सत्य

“मला भेटण्यासाठी माझ्या आई बाबांना दवाखान्यात यायला लागायचं.”

urmila nimbalkar

मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्मिला ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही महिन्यांपासून उर्मिला ही सिनेसृष्टीपासून दुरावली आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने सिनेसृष्टीत काम न करण्यामागचे कारण सांगितले आहे. त्याबरोबरच तिने सिनेसृष्टीतील भयाण वास्तवाबद्दलही भाष्य केले आहे.

उर्मिला निंबाळकरने नुकतंच थिंक बँक’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला सिनेसृष्टीत पुन्हा सक्रीय कधी होणार याबद्दल विचारणा करण्यात आली. मात्र त्यावेळी तिने मला भरपूर काम मिळत होतं, पण मला ते करायचं नव्हतं, असे स्पष्टपणे सांगितले. त्यावेळी तिने यामागे नेमकं कारण काय याचा देखील खुलासा केला.

“मी मालिकांमध्ये काम करताना दिवसाचे १३ तास कमीतकमी तर १७ ते १८ तास सलग शूटिंग करायचे. सर्वच मालिकांमध्ये काम करताना हे होतं. माझ्या या जीवनशैलीचा माझ्या तब्येतीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. मला इतकंच काम करावं लागणार हे माझ्या लक्षात आलं होतं. मी जर कधी आजारी पडले तरी औषध घेऊन, सलाईन लावून मला काम करायला लागायचं. मला भरपूर काम मिळत होतं पण मला ते करायचं नव्हतं. कारण यामुळे मला स्वत:च आयुष्यच नसणं हे मान्य नव्हतं. मला ते काम अजिबात आवडत नव्हते.

त्यावेळी ओटीटी हे माध्यमही लोकप्रिय होत होतं. त्यामुळे मालिकांमध्ये काम करताना कामाचं खूप प्रेशर होतं. मी ज्या प्रकारच्या मालिकेत काम करते, त्यापेक्षा खूप वेगळा कंटेट मी प्रेक्षक म्हणून बघायचे. त्यावेळी आपण फक्त पैसे मिळवण्यासाठीच करायचंय का? असा प्रश्न मला पडायचा. आपल्या कामातून आपल्याला समाधानही मिळायला हवं. या सगळ्या बिझी शेड्यूलमुळे माझी अनेकदा तब्येत बिघडायची. मला भेटण्यासाठी माझ्या आई बाबांना दवाखान्यात यायला लागायचं. त्यामुळे मी मालिकांमध्ये काम करणं थांबवलं”, असा धक्कादायक खुलासा उर्मिला निंबाळकरने केला.

दरम्यान अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या अभिनयाचा जोरावर प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप निर्माण केली. ‘दुहेरी’, ‘बन मस्का’ या मराठी मालिकांमधून ती सिनेसृष्टीत झळकली. त्याबरोबर तिने ‘दिया और बाती हम’, ‘एक तारा’ यांसारख्या हिंदी मालिकाही केल्या. सध्या ती मालिका विश्वापासून दूर आहे. ती तिच्या या युट्यूब चॅनलकडे लक्ष देत आहे. त्याबरोबर ती मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 08:39 IST