उत्तराखंड येथील केदारनाथ धाम भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने केदारनाथ यात्रेला जातात. ही यात्रा फारच कठीण आहे, त्यामुळे असंख्य भाविक केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा मार्ग निवडतात. तर, काही भाविक हा संपूर्ण ट्रेक पायी पूर्ण करतात. यंदा २२ एप्रिलला केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले.
दिवाळीनंतर जवळपास ६ महिने हे मंदिर बर्फवृष्टीमुळे भाविकांसाठी बंद असतं. त्यामुळे मंदिराचे दरवाजे उघडल्यावर दरवर्षी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा नुकतीच केदारनाथला पोहोचली आहे. या प्रवासादरम्यानचे खास फोटो अन् व्हिडीओ या अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचं नाव आहे विदिशा म्हसकर. ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असलेल्या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मालिका संपल्यावर कलाकारांना व्यग्र शेड्युलमधून बराच वेळ मिळतो. त्यामुळे विदिशा आता केदारनाथला पोहोचली आहे.
विदिशा व्हिडीओ शेअर करत म्हणते, “आता वाजलेत पहाटेचे चार…मी जस्ट हा ट्रेक सुरू केला आहे. यासाठी अर्थात मी मध्यरात्री दोन वाजता उठले. आता मनात खूप जास्त उत्सुकता आहे…बघुयात.” यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजेच जवळपास पाच तास चालल्यानंतर अभिनेत्रीने फक्त ४ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला होता. केदारनाथला काही भाविक घोड्यावरून प्रवास करत सुद्धा त्यांची यात्रा पूर्ण करतात. आता पायी प्रवास करणाऱ्यांना या घोड्यांमुळे अनेकदा त्रास होतो…त्यामुळे अभिनेत्री पुढे सांगते, “घोड्यांचा ट्रेक आहे की माणसांचा…हे सुद्धा समजत नाहीये. हे लोक मधून जातात आणि आपण बाजूने जायचं.”

पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी बरोबर अडीच वाजेपर्यंत विदिशा मंदिरापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर होती. ही संपूर्ण यात्रा पूर्ण करण्यासाठी तिला जवळपास १२ तास लागले. हा एवढा प्रवास केल्यावर जेव्हा मंदिर दिसतं, तेव्हा सगळा थकवा दूर होतो….. अजून काय हवं? असं विदिशा व्हिडीओमध्ये सांगते. मंदिराला पाहताच अभिनेत्री भावुक झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता यावर्षी केदारनाथ धामला कोणकोणते मराठी कलाकार भेट देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्यावर्षी प्राजक्ता माळी, अमृता खानविलकर, मंजिरी ओक अशा बऱ्याच कलाकारांनी केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्याचं पाहायला मिळालं.
