“बाई मला गं वेड लावलं…तुझ्या रुपाने वेड लावलं” या मराठी गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नील साळेकर आणि यशश्री राव यांची जोडी या गाण्यात एकत्र झळकली. नील-यशश्री यांचा भन्नाट डान्स, अतरंगी हूकस्टेप या सगळ्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांसह असंख्य मराठी कलाकार सुद्धा ‘वेड लावलं’ गाण्यावर थिरकले आहेत.

‘वेड लावलं’ हे जबरदस्त गाणं निहार शेंबेकर आणि शार्क ( Shark ) यांनी गायलं असून, या दोघांनीच या गाण्याला संगीत दिलं आहे. गेल्या महिन्याभरात या गाण्याला करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नव्हे तर सोशल मीडिया रील्सवर सुद्धा या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. याच ट्रेंडिंग गाण्यावर आता मराठी कलाविश्वातील जुळ्या बहिणींच्या जोडीने ठेका धरला आहे. या दोघी कोण आहेत पाहुयात…

‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ ( पर्व- १ ) आणि सध्या सुरू असलेली ‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिकेत या जुळ्या बहिणींनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघींची आई सुद्धा याच मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या जुळ्या बहिणी ‘लागिरं झालं जी’ फेम पुष्पा मामीच्या मुली आहेत. अभिनेत्री विद्या सावळे यांच्या मुली त्यांच्यासह ‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये सवी व कवी या भूमिका साकारत आहेत. या दोघींची खरी नावं नेहा आणि निकिता अशी आहेत.

विद्या सावळे यांना नेहा आणि निकिता या दोन जुळ्या मुली आहेत. यापैकी नेहाने यापूर्वी ‘कलर्स मराठी’च्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सुद्धा काम केलं होतं.

तर, विद्या सावळे यांनी आतापर्यंत ‘लागिरं झालं जी’, ‘जीव झाला येडापिसा’, ‘राजा राणीची गं जोडी’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. आता त्यांच्या मुली देखील प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत.

दरम्यान, नेहा आणि निकिता यांच्या ‘वेड लावलं’ गाण्यावरील जबरदस्त डान्सने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये दोघीही पारंपरिक लूक करून सुंदर तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी लाल अन् नारिंगी शेडच्या साड्या नेसल्या आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.