Vishakha Subhedar Post On Trolling : अलीकडे सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे जणू काही एक समीकरणच झालं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून अनेक चांगल्या गोष्टींचं कौतुक होतं. मात्र कौतुकापेक्षा ट्रोलिंगचं प्रमाणही तितकंच वाढलं आहे. अपमानास्पद पोस्ट आणि मीम्स सोशल मीडियावर शेअर केले जातात. या ट्रोलिंगचा जास्त बळी ठरतो तो कलाकार.
कलाकारांनी कुठल्याही विषयांवर त्यांची मतं व्यक्त केली तर ती मतं न आवडणारे किंवा ती मतं न पटणारे त्यांच्याबद्दलच्या नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करतात. या ट्रोलिंगवर अनेक कलाकार शांत राहणं पसंत करतात. पण काहीजण यावर व्यक्त होतात, यापैकी एक अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा यांनी ट्रोलर्सबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे.
विशाखा यांनी ट्रोलर्सवर पद्यात्मक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका माणसाचा शांत बसलेला फोटो पोस्ट केला आहे आणि या पोस्टसह त्यांनी ट्रोलिंगबद्दलच्या भावना कॅप्शनमधून व्यक्त केल्या आहेत. तसंच या पोस्टमधून त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे. विशाखा यांनी शेअर केलेली पोस्ट अशी आहे की…
प्रेक्षक आज समोर बसत नाही,
तो स्क्रीनच्या मागे लपतो,
दोन ओळी लिहून
कलाकाराचं संपूर्ण आयुष्य
मोजून टाकतो.
“फार काही नाही.”
“ओव्हर अॅक्टींग”
“हिला कुणी घेतलं?”
हे शब्द ‘हलके
वाटतात वाचताना,
पण कलाकारासाठी
ते पूर्ण दिवसाचं ओझं होतात.
स्टेजवर उभं राहून
अपयश स्वीकारणं सोपं असतं,
पण ट्रोलिंगमध्ये
अपयशाला चेहरा नसतो.प्रेक्षक विसरतो,
कलाकार हा पोस्ट नाही किंवा AI नाही.
तो मन आहे,
श्वास आहे,
रोज काम करणारा माणूस आहे.ट्रोल करणाऱ्याला
कलाकाराचं मौन
कमजोरी वाटतं,
पण ते मौन
पुढच्या भूमिकेची
तयारी असते.
कलाकार आजही येतो,
ट्रोलिंग खाली नाही,
तर स्टेजच्या स्पॉट लाइटमध्ये..
कारण काही जण
हसतात, चिडवतात, डिवचतात म्हणून नाही,
तर काही जण
समजून घेतात, प्रेम करतात म्हणून.प्रेक्षक हसतो,
टाळी वाजवतो,
आणि निघून जातो..
जसं काही
हलकी करमणूक पाहून आलो,
पण स्टेजवर उभा असलेला कलाकार
हलका नसतो,
तो आतून
खूप भार घेऊन उभा असतो.
काही तासांचा अभिनय
म्हणजे फक्त तास नाहीत,
त्याआधीचे
अनेक दिवस,
अनेक अपयश,
आणि न बोललेले प्रश्न असतात.
प्रेक्षक म्हणतो,
“आज फार भारी नव्हतं.”
पण कलाकार
पूर्ण रात्र,
तेच वाक्य…
मनात घोळवत बसतो.
कारण कलाकार
टाळीवर जगतो असं असलं जरी ,
तरी तो मान्यतेवर तग धरतो.
कधी कधी
प्रेक्षक कलाकाराला
हलके घेतो,
पण त्याला माहीत नसतं,
मन उघडं ठेवून उभं राहणं
हे सगळ्यात अवघड काम असतं.
पण तरीही
कलाकार उद्या पुन्हा येतो,
तेच स्टेज,
तोच प्रकाश,
आणि नव्यानं
स्वतःला मांडतो.
कदाचित म्हणूनच
तो हलका वाटतो,
कारण तो
सगळं जडत्व
आत ठेवतो.
रंग लावून
इतरांना रंगात भिजवतो.”
दरम्यान, विशाखा यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी विशाखा यांच्या पोस्टर सहमती दर्शवली आहे, तर काहींनी कमेंट्समधून त्यांना या ट्रोलिंगकडे अधिक लक्ष न देण्याचा सल्लाही दिला आहे.

