Vishakha Subhedar Son Return To India : मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा (अभिनय सुभेदार) कुवेतमध्ये अडकला होता. मध्यपूर्वेतील तणावामुळे लंडनला जात असताना त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवलं गेलं. त्यामुळे तो तिथेच अडकला होता. त्यानंतर मुलाला सुखरूप भारतात परत आणण्यासाठी विशाखा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली होती. अखेर आता तो मायदेशी परतला आहे.

विशाखा सुभेदार यांच्या मुलाच्या मदतीच्या व्हिडीओची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गेठे यांनी अभिनयशी संपर्क करून त्याची विचारपूस केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही विशाखा सुभेदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून, त्याला भारतात आणण्याचा विश्वास दिला होता. आता अभिनय भारतात परतला आहे.

अभिनय भारतात परतल्यानंतर विशाखा यांनी एबीपीशी संवाद साधला आणि मुलगा सुखरूप भारतात परतल्याबद्दल आनंदही व्यक्त केला. यावेळी विशाखा म्हणाल्या, “अभिनयच्या मदतीचा व्हिडीओ केला होता, तेव्हाही माझ्या डोळ्यांत पाणी होतं आणि आज आनंदाश्रू आहेत. मी त्याला जवळजवळ १० दिवसांनी पाहिलं. कुवेतला ज्या हॉटेलमध्ये तो राहत होता, तिथे जवळच मिसाईल, ड्रोन पडत असल्याचं तो सांगायचा. तेव्हा मी खूप घाबरले होते. आता त्याला बघून खूप आनंद झाला आहे. आम्ही सगळेच कुटुंबीय तो भारतात कधी येतोय, याची वाट बघत होते. तिथे नक्की काय परिस्थिती होती, ते आता त्याने आल्यावर सविस्तर सांगितलं. दिवस-रात्र सायरन वाजत होते; ज्यामुळे भीतीचं वातावरण होतं, असं तो म्हणाला.”

“सगळ्या यंत्रणेमुळेच आज अभिनय घरी परतला” : विशाखा सुभेदार

पुढे विशाखा म्हणाल्या, “ड्रोन वगैरे पडतायत हे पाहून मी व्हिडीओ केला. दुबईमधून विमानातून भारतीयांना घेऊन येत होते. आता १२० लोक परत आले. त्यापैकी २४ जणांचे व्हिसा अडकले होते. सरकारनं सगळ्यांचं काम केलं. मुलाला कसं आणता येईल यासाठी मी तो व्हिडीओ पोस्ट केला होता आणि एकनाथ शिंदेसाहेब यांनी लगेच त्याची दखल घेतली. साहेब म्हणाले, “दुबईतून लगेच व्यवस्था होऊ शकते; पण कुवेतमधून अवघड आहे. कारण- तिथली एअरस्पेस मिळत नव्हती. म्हणून मी जास्त काळजीत होते. एकनाथ शिंदेंप्रमाणे देवेंद्र फडणवीस, मनोज मुंढे, मुरलीधर मोहोळ अशांनी सूत्रं हलवली. मग कुवेतचा व्हिसा आणि नंतर सौदीचा व्हिसा हवा होता. याची एम्बेसीकडून सर्व व्यवस्था केली गेली. या सगळ्या यंत्रणेमुळेच आज अभिनय घरी परतला आहे. त्यामुळे त्यांचे आभार. देवेंद्र फडणवीस यांनी गल्फमध्ये फोन करून त्यांनी व्हिसा मागवून घेतला आणि बसने रियाधमध्ये आले; पण तिथेही हल्ले होत होते. त्यामुळे ते पुन्हा रियाधला परतले. मग विमानाने ते सकाळी भारतात परतले.”

“एका दिवसात २०-२० मिसाईल पडताना पाहिले” : अभिनय सुभेदार

त्यानंतर अभिनयनंसुद्धा तिथली परिस्थिती सांगितली. “आजूबाजूला आम्ही एका दिवसात २०-२० मिसाइल्स पडताना पाहिले. त्यामुळे आम्हाला हॉटेलमध्ये राहतानासुद्धा भीतीच वाटत होती; पण तिथल्या यंत्रणेमुळे लोकांना काही झालं नाही, याबद्दल त्यांचं कौतुकच आहे”, असं तो म्हणाला.

दरम्यान, विशाखा यांनी सोशल मीडियावर मदतीचा व्हिडीओ शेअर करीत माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता; पण त्याचं फ्लाइट कुवेतमध्ये उतरवण्यात आलं. त्यामुळे माझा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. तिकडची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अनेक ड्रोन हल्लेसुद्धा होत असल्याचं सांगितलं होतं. या व्हिडीओद्वारे त्यांनी मुलाला भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी कळकळीची विनंती केली होती. अखेर अभिनय भारतात सुखरूप परतला आहे.