दरवर्षी २१ जून रोजी जगभरात ‘योग दिवस’ साजरा केला जातो. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीरही या आसनांसाठी अनुकूल होतं. मराठी मनोरंजनविश्वातील अनेक अभिनेत्री आपल्या फिटनेससाठी योगाभ्यास करताना दिसून येतात. अभिनेत्री योगिता चव्हाण सुद्धा फिट राहण्यासाठी योगाला प्राधान्य देते. सध्या ती सन मराठीवरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. आज ‘योग दिवस’निमित्ताने योगिताने तिच्या फिटनेसविषयी सांगितलं आहे.

योगिता चव्हाण सांगते, “एक अभिनेत्री म्हणून स्वतःला फिट ठेवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कलाकारांचं कामाचं वेळापत्रक खूप धावपळीचं आणि अनियमित असतं. सततचं शूटिंग, प्रवास आणि त्यामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे एक मोठं आव्हान असतं. पूर्वी मी जिमवर जास्त भर द्यायचे, पण आता मला योगाचं खरं महत्त्व समजलं आहे.”

अभिनेत्री पुढे म्हणते, “माझ्या दिवसाची सुरुवात योगापासून होते. मलासनमध्ये बसून गरम पाणी पिणं, प्राणायाम आणि काही सोप्या योगासनांनी मी दिवसाची सुरुवात करते. यामुळे खूप फ्रेश वाटतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. योग हा फक्त व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा एक सुंदर मार्ग आहे. मला थायरॉईडचा त्रास आहे आणि नियमित योगामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होत आहे. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, ताण कमी होतो आणि आत्मविश्वासही वाढतो.”

“आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःसाठी वेळ काढणं विसरून जातो, पण दिवसातील काही मिनिटं योगासाठी दिली तर त्याचा फायदा संपूर्ण दिवसभर जाणवतो. आजकाल प्रत्येक आजारासाठी औषधं उपलब्ध आहेत, पण निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयी आणि शिस्तबद्ध जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. योग आपल्याला स्वतःशी जोडतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवतो.माझ्या मते, योग हा कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. तुम्ही किती व्यग्र असलात तरी दिवसातून काही मिनिटं योगासाठी द्या. निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी आयुष्यासाठी योगासारखा दुसरा मित्र नाही.” असं मत योगिता चव्हाणने मांडलं आहे.