scorecardresearch

“चेहऱ्याला सूज, ओठ फाटलेले तरीही…” ‘झी मराठी’वरील मालिकेच्या कलाकाराची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आपल्याला किती पैसे मिळवून देतं हा संसारिक विचार सगळे करतात.

“चेहऱ्याला सूज, ओठ फाटलेले तरीही…” ‘झी मराठी’वरील मालिकेच्या कलाकाराची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. याच वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेतून अनेक नवीनवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून रोहित परशूराम याला ओळखले जाते. या मालिकेत तो अर्जुन हे पात्र साकारत आहे. या मालिकेच्या शूटींगच्या निमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.  

रोहित परशूराम हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच रोहितने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका रुग्णालयात काढल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्या मुलाच्या हाताला सलाईन लावल्याचेही यात दिसत आहे.
आणखी वाचा : “मराठी टीव्ही सीरियलच्या इतिहासात…” ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

रोहित परशुरामची पोस्ट

“किसी को हो ना हो हमें हैं ऐतबार…. जीना इसी का नाम हैं|

आज सातारा हॉस्पिटलमधे एक सीन शूट होणार म्हणून आलो होतो. मेक अप कॉस्च्युम झाल्यावर थोडा वेळ मिळाला आणि बॅगेतून ‘व्यक्ती आणि वल्ली’ काढून चितळे मास्तर वाचायला घेतलं…. “मास्तरांच्या पडवीत कंदिलाच्या उजेडात पहाटे चालणारा क्लास आजही माझ्या स्वप्नात येतो.” ही ओळ वाचली आणि माझ्या खांद्यावर कोणीतरी हळूच थाप दिली. “खालच्या मजल्यावर एक मुलगा ऍडमिट आहे, त्याला कळलय की इकडे शूटिंग चालू आहे, तो तुम्हाला भेटण्यासाठी २ दिवसांनंतर उठून बसलाय, त्याची आई बाहेर थांबली आहे. येता का जरा प्लिज?” निलेश सोनटक्के नावाचा चेहऱ्यावरून अतिशय जेण्युअन दिसणारा माणूस माझ्याकडे खूप अपेक्षेने पण प्रश्नार्थक मुद्रेने बघत होता.

“हो हो…नक्कीच.” माझा माझ्यावर कंट्रोल नव्हता. मी माझ्याच नकळतपणे हो म्हणालो होतो आणि मला त्याबद्दल स्वतःचं कौतुकही वाटत होतं.
मी दुसऱ्या मजल्यावर गेलो. सलाईन लावलेला दिग्विजय खरंच उठून बसला होता. त्याच्या चेहऱ्याला सूज आली होती, ओठ फाटले होते तरीही तो हसून म्हणाला “शहेनशाह !!” आणि माझ्या डोळ्यांत त्याच्यासाठी आणि त्याच्या माऊलीसाठी अश्रू होते. डोळ्यांवर चष्मा असला की बरं असतं…पाणी लपवता येतं. मी माझा गॉगल त्याला घातला.

“अले वाह… चॅम्पियन काय झालं रे तुला?”
“आजारी झालो मी.”
“कसा काय?”
“काय माहित?” त्याने खालचा ओठ पुढे काढून त्याला जे माहीत होतं ते उत्तर दिलं.
“लवकर बरं व्हायचं आणि व्यायाम करायचा रोज, सायकल चालवायची.”

मी निघून आलो. “पोरगं खुश झालं बरं का सर “. मनापासून हसत हसत निलेश सोनटक्के म्हणाला. मग मला न मागता फोटो आणून दिले, “परत साताऱ्यात काहीही लागलं तरी बिनधास्त फोन करायचा सर.” अशी विनंतीवजा ऑर्डर करून निघून गेला.

प्रसंग छोटा होता पण त्याचं मूल्य खूप होतं. माझ्यासाठी, त्या आईसाठी, दिग्विजयसाठी आणि निलेशसाठी सुद्धा ! आपलं काम आपल्याला किती पैसे मिळवून देतं हा संसारिक विचार सगळे करतात..मी ही करतो पण आपलं काम जेव्हा आपल्याला पैशाने न मिळणारं सुख देऊन जातं तेव्हा वाटतं…. आपण सन्मार्गाने चाललो आहोत !! दिग्विजयचा आणि त्याच्या आईचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे !” असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

झी मराठीवर नेहमीच विविध धाटणीच्या मालिका प्रसारित होत असतात. ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली आहे. खेडेगावात राहणाऱ्या आणि जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या अप्पीला कलेक्टर व्हायचं आहे. त्यासाठी ती जीव तोडून मेहनत घेत आहे. अभ्यास करत त्यातील अडथळे पार करत कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 19:35 IST

संबंधित बातम्या